स्वच्छतेचा पुरस्कार मिळवणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेला डेब्रिजच्या समस्येवर मात्र अद्याप मात करता आलेली नाही. एकीकडे आयुक्त डेब्रिज हटावसाठी नव्या उपाययोजना करत असताना दुसरीकडे डेब्रिज शोधपथकांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ऐरोली परिसरात डेब्रिजचे डोंगर निर्माण झाले आहेत.
ऐरोली सेक्टर २० येथील नेव्हा गार्डनशेजारी मोकळ्या भूखंडावर डेब्रिज माफियांनी डेब्रिज टाकून हा मोकळा भूखंड गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. या मोकळ्या भूखंडावर असणाऱ्या झाडांचीही कत्तल करण्यात आली आहे. डेब्रिज टाकण्यासाठी चांगल्या रस्त्यावर मातीचा भराव टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे. दिवा सर्कलनजीकच्या रस्त्यालगत,  ऐरोली गावदेवी मैदानासमोर, सेक्टर ८ येथील भारतीय स्टेट बँकेच्या मोकळ्या जागेवर तसेच पटनी कंपनीच्या खाडीकिनारी डेब्रिजचे ढीग साचले आहेत.
डेब्रिजच्या विषयावर महासभेमध्ये रणकंदन झाल्यावर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रभाग अधिकारी व महापालिका पथकाला सक्त आदेश देत डेब्रिज माफियांवर कारवाई करण्याचे सांगितले. यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत इमेलच्या माध्यमातून लोकांना माहिती देण्याचे आवाहनही केले. मात्र, सेक्टर २० येथील मोकळ्या भूखंडावर भरदिवसा डेब्रिज टाकण्यात येत असून पालिकेच्या पथकाला डेब्रिजचे हे डोंगर कसे दिसले नाहीत, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
ऐरोली सेक्टर २० येथे मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्याची माहिती मिळाली असून आमच्या पथकाला त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
– महेंद्र सप्रे, ऐरोली विभाग आधिकारी