कांदा-बटाटा बाजारातील माथाडींचा काम बंदचा इशारा

नवी मुंबई : ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी नसाव्यात असा शासन निर्णय असतानाही एपीएमसीतील कांदा-बटाटा बाजारात माथाडींना त्यापेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलाव्या लागत आहेत. यासाठी कामगारांनी वारंवार मागणी केली आहे. मात्र त्याचे अनुकरण होत नसल्याने १ मार्चपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

११९४ मध्ये शेतमालाच्या गोणीचे वजन १०० किलोपेक्षा अधिक होते. मात्र त्यामुळे माथाडी कामगरांना अनेक शारीरिक आजारांना समोरे जावे लागत होते. त्यानंतर हे वजन ७० किलोपर्यंत आले. मात्र आता एपीएमसी बाजारातील जुने माथाडी कामगारांना उतार वयात अधिक वजनाचे ओझे उचणे अशक्य होत आहे. तसेच नोकरी नसल्याने अनेक तरुणही हे काम करीत असून त्यांनाही हे अधिकचे वजन पेलणे अशक्य होत आहे. याबाबत शासनाने गोणीचे वजन हे ५० किलोपेक्षा कमी असावे असा निर्णय घेतला आहे. मात्र येथील कांदा-बटाटा बाजारात ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या असतात. हे वजन कमी करावे अशी येथील कामगारांची मागणी आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने  १ फेब्रुवारी रोजी माथाडी कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर एपीएमसी प्रशासन, सभापती अशोक डक, माथाडी संचालक शशिकांत शिंदे यांनी मध्यस्थी करीत १५ दिवसांची मुदत घेतली होती. त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय येथील कामगारांनी घेतला आहे.

कांदा-बटाटा बाजारात ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी असू नयेत असा शासन निर्णय असूनही जास्त वजनाच्या गोणी भरल्या जात आहे. त्यामुळे माथाडी कामगारांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे १ मार्चपासून पुन्हा कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. – विठ्ठल धनावडे, मुकादम, माथाडी कामगार, कांदा-बटाटा बाजार