नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन तीन महिने झाल्यानंतर अखेर दप्तरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण मंडळाच्या उदासीनतेमुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दप्तरे मिळाली नव्हती. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी झालेल्या गदरोळानंतर १ कोटी ४० लाख रुपयांच्या दप्तर खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सन २०१५ – १६ साठी दप्तरे देण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत विषयपटलावर घेण्यात आला. शाळा सुरू होऊन तीन महिने झाल्याने या विलंबाबाबत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये घट होत असताना पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना दप्तरे मिळाली नाहीत तर शिक्षणाचा पाया कसा सुधारेल, असा प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी उपस्थित केला. तर नगरसेवक एम. के. मढवी यांनी हा प्रस्ताव एवढय़ा उशिरा आणल्याबद्दल शिक्षण उपआयुक्त अमरिश पटनगिरी यांच्याकडे विचारणा केली. एप्रिल आणि मेच्या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्याने या प्रस्तावांची निविदा काढण्यात आली नाही, असे पटनगिरी यांनी स्पष्ट केले. शाळा सुरू झाल्यांनतर निविदा काढण्यात आली. त्यानुसार टेक्सस लेदर लिमिटेड या कंपनीची अत्यल्प निविदा लक्षात घेऊन त्याला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार पहिली ते दुसरी, तिसरी ते पाचवी, आणि सहावी ते आठवी अशा वर्गाच्या विद्यार्थ्यांना वह्य़ा-पुस्तकांच्या प्रमाणानुसार दप्तर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेला इतर क्षेत्रात पुरस्कार मिळत असताना शिक्षण मंडळाने मात्र कार्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत सदस्य एम. के. मढवी यांनी व्यक्त केले.