राज्यात बर्ड फ्लूचा धोका वाढला असताना नवी मुंबईत गेले आठ दिवस पक्ष्यांचा मृत्यू होत असून त्याच्या तपासणीकडे दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे. आठ दिवसांपासून अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ते सोमवारी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे पालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

नवी मुंबईत आठवडाभरात २१० मृत पक्षी आढळले आहेत. मात्र त्यांचा तपासणी अहवाल अद्याप मिळाला नसल्याने भीती वाढली आहे. दररोज मृत पक्षी आढळत असताना याचे कारण पुढे येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. ठाणयात काही मृत पक्षी आढळले असून त्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नवी मुंबईत मृत पक्ष्यांची संख्या २१० पर्यंत पोहचली आहे. आठ दिवसांपासून पालिका प्रशासन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगत होते. मात्र याचा अहवाल का मिळत नाही? याबाबत अधिक माहिती घेतली असता, १३ व १४ जानेवारी आढळलेल्या मृत पक्ष्यांपैकी आठ नमुने पालिका प्रशासनाने शुक्रवारी (१५ जानेवारी) रोजी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडे दिले होते. त्यांच्याकडून ते सोमवारी (१८ जानेवारी) रोजी पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेवर राज्यभरातील नमुने येत असल्याने त्यांच्यावर तपासणीचा भार आहे. त्यामुळे वेळ होत असल्याचे महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंझारे यांनी सांगितले.

मात्र मृत पक्ष्यांचे अहवाल न मिळाल्याने चिकन विक्री करणाऱ्या दुकानांचे सर्वेक्षणही रखडले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सर्वेक्षण सुरू करण्यात येईल अशी भूमिका महापालिका आरोग्य विभागाने घेतली आहे. नवी मुंबई शहरातील झोपडपट्टी आणि गावठाण भागातील ८० टक्के चिकन दुकानांची नोंद पालिकेकडे नाही. त्यामुळे सर्वेक्षण करण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे.

शहरात एकही कुक्कुटपालन नसल्याने बर्ड फ्लूचा धोका नाही असे पालिकेचा पशुसंवर्धन विभाग सांगत आहे. मात्र शहरात कुक्कुटपालन नसले तरी इतर ठिकाणांहून शहरात कोंबडय़ांची मोठी आवक होत असल्याने धोका असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.