वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न कांदा-बटाटा बाजार समितीत दोन दिवसांपासून आवक वाढली आहे. मात्र, ऑगस्टमध्ये राज्यातील नवीन बटाटा दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, राज्यातील बटाटय़ाच्या हंगामाला एक महिना उशिरा सुरुवात होणार असल्याचे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत.

एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात सध्या गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधून बटाटय़ाची आवक सुरू आहे. घाऊक बाजारात रोज ४० ते ४२ गाडय़ा दाखल होत आहेत. सध्या १० हजार ते ११ हजार क्विंटल बटाटा बाजारात दाखल होत आहे. गेल्या वर्षी बटाटा स्वस्त तर कांद्याने शंभरी पार केली होती. यंदा उलट स्थिती झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात राज्यातील बटाटा दाखल झाल्यानंतर दरात घसरण होईल, असे बोलले जात होते. बाजारात तळेगाव, पुसेगाव, वाई आणि सातारा जिल्ह्य़ांतून बटाटा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, कमी पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी उशिराने लागवड केल्याची माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.

आज बाजारात ४० ते ४२ गाडय़ा दाखल झाल्या आहेत. आवक मोठी आहे. तरीही बटाटय़ाला अधिक मागणी आहे. त्यामुळे बाजारात आधी प्रतिकिलो २० ते २४ रुपयांवर असलेला बटाटा आता २२ ते २७ रुपयांवर विकला जात आहे.

घाऊक बाजारात कांदा एक रुपया किलो

एपीएमसी बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक वाढली आहे. त्यातही पावसात भिजलेला कांदा दाखल होत आहे. त्यामुळे कांद्याचा किलोमागे दर एक रुपयावर आला आहे. पावसाळ्यात कांद्याचे दर वधारतात. त्यामुळे पावसाळ्याआधीच कांदे साठवणूक केली जाते. मात्र करोनाकाळात कांद्याच्या दरावर परिणाम होत आहे. दरात घसरण होत आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारात अर्धाअधिक माल भिजलेला आहे. बाजारात उत्तम प्रतीच्या कांद्याला आठ ते दहा रुपये दर आहे, तर भिजलेला कांदा १ ते ३ रुपये किलो दराने विकला जात आहे. सध्या बाजारात करोनामुळे  ग्राहकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे आधीच मालास उठाव कमी आहे. त्यात आता भिजलेल्या कांदा लवकर खराब होत असल्याने कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. भिजलेल्या कांद्याला ग्राहक नसल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.