दहा किलोमीटर मार्गाची देखरेख आणि अंमलबजावणीची दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर जबाबदारी

विकास महाडिक, नवी मुंबई</strong>

नियोजित वेळेपेक्षा आठ वर्षे रखडलेल्या नवी मुंबई मेट्रो मार्गातील तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर आणि खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ या दोन दहा किलोमीटर मार्गाची देखरेख व अंमलबजावणी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने केली जाणार आहे. नवी मुंबई मेट्रोच्या वतीने तयार करण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर या मार्गाची चाचणी दोन महिन्यांपूर्वीच झाली आहे. आता हा मार्ग जून २०२० पर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रकल्प रखडल्याने त्याचा खर्च दुपटीने वाढला आहे. सिडको या चार मार्गावर आठ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

मेट्रो मार्गाचे काम करणारे कंत्राटदार अनेक आर्थिक संकटात सापडल्याने कामात दिरंगाई झाली. अलीकडे या कामात थोडी फार गती आली आहे. स्थापत्य कामे अंतिम टप्यात असताना आता सिग्निलग, तिकीट दर यासारख्या कामांची आखणी करावी लागणार आहे. पहिल्याच मार्गाला इतका विलंब लागल्याने राज्य सरकारने दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन या केंद्र सरकार अंगीकृत कंपनीला पाचारण केले आहे. एमएमआरडीएने मुंबईत दोन मार्गासाठी दिल्ली मेट्रोला अंमलबजावणीचे काम दिले आहे. दिल्ली मेट्रो दोन मार्गासाठी नियम आणि नियमावली तयार करणार असून करारनामाचे नुमने तयार करणार आहे. नवी मुंबई मेट्रोतील प्रकल्प हे विशेष हेतू निर्माण कंपनीतर्फे चालविले जाणार आहेत.

सिडकोने दक्षिण नवी मुंबईत मेट्रो जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. तळोजा एमआयडीसीत जाणारी मेट्रो नंतर एमएमआरडीएच्या माध्यमातून कल्याणपर्यंत जोडली जाणार आहे. पहिल्यांदा बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर अंतराचा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार होता, पण त्याला आता अतिरिक्त मार्गाची जोड देण्यात आली आहे. यात तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर रेल्वे स्थानक, पेंधर ते तळोजा एमआयडीसी आणि खांदेश्वर रेल्वे स्थानक ते नियोजित नवी मुंबई विमानतळ असे  मार्ग तयार करण्यात आले आहेत.

मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवाशांसाठी जास्तीत जास्त दळणवळण जाळे निर्माण व्हावे यासाठी या अतिरिक्त मार्गाचा विस्तार हाती घेण्यात आला आहे. एकूण २६ किलोमीटर मार्गाच्या या मेट्रो मार्गावर एकूण २१ रेल्वे स्थानके उभारली जाणार आहेत. त्यासाठी आता आठ हजार ९०४ कोटी रुपये खर्च होणार आहे. नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गाची सुरुवात होण्यास अनेक अडचणी आलेल्या आहेत. त्यामुळे पहिल्या तीन वर्षांत होणारा हा मार्ग आठ वर्षे रखडला आहे.

३७३ किलोमीटर अंतरावर दिल्ली मेट्रोचे जाळे

देशात पहिली मेट्रो कार्यान्वित करण्याचा मान दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला जात असून त्यांनी डिसेंबर २००२ मध्ये दिल्लीत शाहादार ते तीस हजारी दरम्यान पहिली मेट्रो सुरू झाली. त्यानंतर आता दिल्ली मेट्रोने दिल्लीच्या बाहेरही विस्तार झाला असून ३७३ किलोमीटर अंतरावर दिल्ली मेट्रोचे जाळे आहे. यात २७१ रेल्वे स्थानके असून दिल्लीतील प्रदूषण आणि वाहतूक कोंडीवर ही मोठी उपाययोजना मानली जात आहे. त्यामुळेच या कॉर्पोरेशनला मुंबईतील आणि आता नवी मुंबईतील मेट्रो अंमलबजावणीचे काम मिळाले आहे.

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला नवी मुंबई मेट्रोतील दोन मार्गाच्या अंमलबजावणीचे काम देण्याचा निर्णय झाला आहे, मात्र अद्याप ते काम प्रत्यक्षात देण्यात आलेले नाही. पुढील वर्षी पहिल्या टप्प्यातील मार्ग सुरू करण्याचा सिडको प्रयत्न करीत आहे.

-एस. के. चौटालिया, एस. के. चौटालिया, मुख्य अभियंता, सिडको