उरणमधील औद्योगिकीकरणामुळे शेतीचे प्रमाण घटल्याने शेतीची औजारे बनविणारा लोहार समाज प्रतिकूल परिस्थितीत जगत आहे. राज्यातील अनेक ठिकाणांहून व खास करून मराठवाडय़ातून पोटाची खळगी भरण्यासाठी लोहारकाम करणारी अनेक कुटुंबे आठ महिन्यांसाठी उरण व पनवेल परिसरात येतात. मात्र येथील शेती व्यवसायच घटू लागल्याने या लोहार कुटुंबांवर बकऱ्यांचे भाजलेले मांस विकून पैसे कमाविण्याची वेळ आली आहे.
रायगड जिल्हा हे भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात उरण तालुक्याचा क्रमांक वरचा लागतो. मात्र गेल्या काही वर्षांत येथील जमिनीला सोन्याचा भाव आल्याने शेती व्यवसाय कमी झाला आहे. ६ हजार १८० हेक्टर पिकाखालील जमीन आता २ हजार ६०० हेक्टरवर आली आहे. याचा फटका शेतीची औजारे तयार करणाऱ्या लोहार समाजाला बसत आहे. पावसाळा सरल्यावर राज्यातील विविध भागांतून आलेले हे लोहार गावोगावी पाले टाकतात. ओबडधोबड लोखंडाला भात्याच्या सहाय्याने कोळशावर तापवून, त्यावर घणाचे घाव घालून आकार दिला जातो. या कामी त्यांच्या अर्धागिनींचेही सहकार्य असते. या लोहारांना कोपरखैरणे येथून कोळसा आणावा लागतो. गेल्या वर्षी १० रुपये किलो असलेला कोळसा आता २० रुपये किलोवर गेला आहे. तसेच औजारांसाठी लागणाऱ्या मुठीचे लाकूडही महाग झाले आहे. शिवाय शहर परिसरात राहून जगताना दिवसअखेरीस काहीच शिल्लक राहात नाही.
या परिस्थितीत या मंडळींच्या भात्याचा उपयोग आता वेगळ्याच कारणांसाठी होऊ लागला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी रविवार तसेच इतर दिवशी स्थानिकांनी आणलेले बकरीचे मांस भाजून त्यातून चार पैसे कमावण्याची वेळ आमच्यावर आली आहे, अशी खंत अंकुश पवार या लोहाराने व्यक्त केली.