मात्र पालिका म्हणते, अवघे ३४ रुग्ण

पनवेलमध्ये डेंग्यूच्या आजाराने एका महिलेचा मृत्यू झाला असला तरी महापालिकेतील आरोग्य विभागाने पालिका क्षेत्रात सध्या ३४ रुग्ण असल्याची माहिती सर्वसाधारण सभेत जाहीर करून पालिकेने काखा वर केल्या आहेत.

गेले अनेक दिवस डेंग्यूविषयी पाठपुरावा करणारे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यांनी कळंबोली येथील पालिकेच्या एका नागरिक आरोग्य केंद्रात ऑगस्ट ते १९ नोव्हेंबपर्यंत २० रुग्ण असल्याची माहिती सभागृहात जाहीर केली होती. कळंबोली येथील सेक्टर-२ मधील ‘एलआयजी’ या बैठय़ा चाळीत राहणाऱ्या प्रतिभा देवरे यांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे निवेदन बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शेकापच्या सदस्यांनी केले. मात्र पनवेल पालिकेतील आरोग्य विभागाचे अधिकारी देवरे यांचा मृत्यू डेंग्यूने झाला नसून त्यांचा मृत्यू विविध अवयव निकामी झाल्याने झाल्याचे स्पष्टीकरण देत आहेत.

कळंबोली येथील शेकापचे सदस्य गोपाळ भगत यांनी डेंग्यू, मलेरिया व अतिसार या विविध आजारांविषयी उपाययोजना व प्रशासनाने केलेल्या माहितीचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्यांना प्रशासनाकडून टोलवाटोलवीचे उत्तर देण्यात आले. भगत यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार कळंबोली येथील सिंग सीटी रुग्णालयात डेंग्यूचे तीन रुग्ण, तर डॉक्टर दिनेश पाटील यांच्या दवाखान्यात दोन डेंग्यू रुग्ण आढळले असल्याचे सांगितले. प्रतिभा देवरे यांच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी त्यांच्या मुलाला डेंग्यू झाला. त्याच्या शरीरातील पेशी दहा हजारांवर आल्याने त्याच्यावरही वाशी येथे उपचार करण्यात आल्यानंतर तो मुलगा वाचल्याचे या वेळी भगत यांनी सांगितले. भगत यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या डेंग्यूविषयी जनजागृतीकडे लक्ष वेधले. नागरी आरोग्य केंद्रातील  रोजची रुग्णांची आकडेवारी, खासगी दवाखाने व रुग्णालयांची आकडेवारी चुकीची असल्याचा दावा केला. तसेच पालिकेतील आरोग्य अधिकारी दालनात बसून माहिती घेण्याऐवजी दोनही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्या आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांची कमतरता आहे अशा ठिकाणी किमान रुग्णांवर उपचार करावा, अशी मागणी केली आहे. पनवेल पालिकेच्या सहा नागरी आरोग्य केंद्रांत प्रत्यक्षात चार डॉक्टर्स काम करतात. पनवेलमध्ये नेमके किती रुग्ण डेंग्यू व इतर साथीच्या आजारांचे आहेत याची पक्की आकडेवारी मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आजही उपलब्ध नाही.

पनवेल पालिकेचा आरोग्य विभाग सभागृहाची दिशाभूल करत आहे. सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. आजही कळंबोली वसाहतीमधील आल्हाट रुग्णालयात १०, डॉ. डोंगरे यांच्या रुग्णालयात ३ व इतर रुग्णालयांत असे सुमारे २० रुग्ण एकटय़ा कळंबोलीत आहेत. सर्वसामान्य जनतेला खासगी रुग्णालयातील डेंग्यू व इतर साथीच्या आजारांच्या उपचाराचा खर्च परवडत नसल्याने आम्ही पालिकेने या रुग्णांना सरकारी पद्धतीने तातडीने उपचार देण्याची गरज आहे. – गोपाळ भगत, नगससेवक, शेकाप

डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृतीचे फलक अनेक सोसायटय़ांच्या उद्वाहनांत लावले आहेत. प्रतिभा देवरे यांच्या प्रकरणात संबंधित मृत्यूचे कारण समजले असून देवरे या डेंग्यूच्या संशयित रुग्ण होत्या. पालिकेचा आरोग्य विभाग डेंग्यूबाबत गंभीर आहे. – डॉ. सचिन जाधव, वैद्यकीय अधिकारी, पनवेल पालिका