शहरात साथीच्या आजाराच्या रुग्णांनी खासगी आणि पालिका रुग्णालये भरून गेली आहेत. मलेरिया, कावीळ, डेंग्यू आणि वातावरणातील बदलांमुळे तापाचे रुग्ण वाढले आहेत. बेलापूर, नेरुळ, तुभ्रे, वाशी, कोपरी गाव, कोपरखरणे, घणसोली, ऐरोली, दिघा विभाग कार्यक्षेत्रात नोड्स आणि गावठाणात डेंग्यू आणि हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. शहरातील अनेक खासगी दवाखान्यात तपासणीसाठी रोज ५० ते ६० रुग्ण येत असल्याची माहिती एका डॉक्टरने दिली.

पालिका रुग्णालयांकडे साथीच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी योग्य यंत्रणा नसल्याने खासगी डाक्टरांनीकडून अनेक रुग्णांची लूट करण्यात येत आहे. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पत्तीवार यांच्याशी सपंर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

पदपथ, रस्त्यांचे खोदकाम 

आयुक्तांनी पावसाळयापूर्वी शहरातील विकास कामे मार्गी लावण्याचे सक्त निर्देश दिले होते. मात्र आयुक्तांच्या या आदेशाला वरिष्ठ आधिकारी आणि ठेकेदारांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. शहरातील विविध भागामध्ये बिनधास्तपणे भर पावसात पादचारी मार्गवर पेव्हरब्लॉक बसवणे, तसेच रस्त्यांचे कामे सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्यांलगत राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यात नालेसफाईच्या अपुऱ्या कामांमुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे.

त्यात आता नागरिकांच्या आरोग्यावर साथीच्या आजारांनी हल्ला चढवला आहे. पावसाळा सुरू होण्याआधी सफाईची कामे केली होती.

यात पालिकेने छोटय़ा गटारांची सफाई न केल्याने पाणी गटारांबाहेर पडून पाण्याची डबकी साचली आहेत. यात कचऱ्याचीही भर पडली आहे. याशिवाय पावसाळ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी औषधे आणि धूरफवारणी करण्यात आलेली नाही.

रुग्णांची संख्या

डेंग्यू  २,मलेरिया ३०, कावीळ ९, गॅस्ट्रो १५९, डायरिया २८, ट्रायफाईड २५, गोवर २७

कचरा रस्तोरस्ती

घरातील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्याची जबाबदारी सोसायटय़ा पूर्ण करणार असतील तरच पालिका कचरा उचलेल, अशी तंबी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली होती. यानंतर अनेक सोसायटय़ांमार्फत तशी कार्यवाही झाली नसल्याने पालिकेने तो न उचलल्याने शहरात कचऱ्याचे विघटन होणे सुरू आहे. ठिकठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये पाणी साचून कुजल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.