तीन तास बैठक; कामात दिरंगाई केल्यास कारवाईचा आयुक्तांचा इशारा

नवी मुंबई : नवी मुंबईत करोनाबाधित रुग्ण वाढत असून आरोग्य विभागाच्या कामाबाबत तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी गुरुवारी बैठक घेत काही अधिकारी, कर्मचारी दिरंगाई करत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यापुढे जर असे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

सुमारे तीन तास ही बैठक झाली. शहराचे लक्ष पालिकेच्या कारभाराकडे आहे. करोनाच्या या संकटकाळातून शहराला व येथील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. करोनाला पालिका जबाबदारीने तोंड देत असताना आरोग्य विभागाच्या कामाबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे आवश्यक आरोग्य सुविधांची पूर्तता योग्य वेळेत होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले. या परिस्थितीत तत्परच राहिले पाहिजे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची दफ्तरदिरंगाई चालणार नाही असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले.

विशेषत्वाने औषध उपलब्धतेकडे बारकाईने लक्ष देण्याची

आवश्यकता आहे. तसेच खाटांची कमतरता भासू नये यासाठी खरेदी प्रक्रियेमध्ये नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे विचारपूर्वक काम करण्याची गरज आहे. चांगल्या दर्जाचे साहित्य पुरवठा न केल्यास पुरवठादाराला काळ्या यादीत टाकण्याचा आदेशही त्यांनी दिला.

काही अधिकारी व कर्मचारी दिरंगाई करीत असल्याचे दिसून आले आहे, तर काही बाबतीत जबाबदारी टाळण्याचे प्रकार होत आहेत. याबाबत आरोग्य विभागाला बैठकीत समज देण्यात आली आहे. जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या आहेत.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका