ऐरोली-कटई नाका मुक्तमार्गाच्या शुभारंभामुळे विकासक आशावादी

नवी मुंबई : आठवडय़ापूर्वी झालेले दिघा रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन आणि सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेला ऐरोली-कटई नाका मुक्तमार्गाचा शुभारंभ यामुळे या दोन भागांत गृहसंकुले उभारणाऱ्या विकासकांत उत्साहाचे वातावरण आहे. आधीच बांधकाम क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे ऐरोली आणि शिळफाटा मार्गातील अनेक सदनिका विक्रीविना पडून आहेत. या दोन प्रकल्पांमुळे या घरांना मागणी येईल, अशी आशा विकासकांना वाटू लागली आहे.

दिघा परिसरातील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी ठाणे किंवा ऐरोली स्थानक गाठण्याशिवाय पर्याय नाही. त्यात कल्याण-डोंबिवलीत कर्जतपासून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना प्रथम ठाण्याला येऊन नंतर नवी मुंबईसाठी दुसरी रेल्वे गाठावी लागते. कळव्याहून दिघा स्थानकाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाची निर्मिती शक्य आहे. त्यामुळे कर्जत मार्गावरील कामगारांना नवी मुंबई, ठाण्याला न जाता प्रवास करणे शक्य होणार आहे. दिघा स्थानकाचे बांधकाम दोन वर्षे रखडले होते. काही विकासकांनी या भागात मोकळे भूखंड घेऊन ठेवले आहेत. दिघा गावच्या वेशीवरच एक-दोन हजार घरांचा प्रकल्प उभा राहात आहे. स्थानकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर बांधून तयार असलेल्या घरांच्या बाबतीत विचारणा सुरू झाली आहे. त्यामुळे विकासकांनी दरवाढ करण्यास सुरुवात केली आहे. ऐरोली ते काटई नाका या मुक्तमार्गाच्या कामास हिरवा कंदील मिळाला आहे. हा प्रकल्प चार-पाच वर्षांत पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला आहे. हा मार्ग पारसिक डोंगरातून जाणार आहे. त्यासाठी दीड किलोमीटरचा बोगदा बनविला जाणार आहे. या कामाच्या घोषणेनेच ऐरोली, मुंब्रा पनवेल मार्गावरील विकासकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. या भागात सुमारे शंभर-दीडशे गृह प्रकल्प उभे राहात असून भाजपच्या एका आमदार विकासकांनी एक आधुनिक नगरीच वसवली आहे. शिळफाटा मार्गावरील वाहतूककोंडीमुळे या नगरीतील घरे विकली जात नव्हती. त्यांना आता मागणी वाढण्याची चिन्हे आहेत.

दिघा रेल्वे स्थानक व ऐरोली-काटई मुक्तमार्गामुळे नवी मुंबईच्या उत्तर बाजूचा विकास होणार आहे. विटावा, कळवा येथील कोंडीमुळे ठाण्याला पोहोचण्यास विलंब होत आहे. या मार्गामुळे गृहनिर्मिती वाढणार आहे.

– हरिश छेडा, अध्यक्ष, नवी मुंबई बिल्डर असोसिएशन