टोलेजंग इमारत असून सेवा मिळते कुठे? १०० खाटांच्या रुग्णालयात परिपूर्ण सेवा कधी?

नेरुळ 

‘प्रभाग क्रमांक ८०, ८१, ८८, ८९, ९०, ९१, ९२, ९९, १००)

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेने नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी करोडो रुपये खर्चातून सात मजल्यांची देखणी इमारत नेरुळ येथे उभारली आहे. खासगी रुग्णालयांच्या इमारतींना लाजवेल अशी इमारत असताना अपुरी आरोग्यसेवा मिळत असल्याने रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १०० खाटांच्या रुग्णालयात परिपूर्ण सेवा कधी मिळणार, असा सवाल करण्यात येत आहे.

महापालिकेने ऐरोली, नेरुळ व बेलापूर येथे रुग्णालयासाठी या इमारती उभारल्या आहेत. नेरुळच्या माताबाल रुग्णालयाच्या देखण्या इमारतीचे अनेक मजले फक्त शोभेसाठी आहेत. येथील प्रसूती विभाग वारंवार बंद असतो. एनआयसीयू नसल्याने गरीब रुग्णांना वाशी किंवा परेलच्या वाडिया रुग्णालयात जावे लागते. आता कुठे ही सेवा सुरू झाली होती, मात्र कर्मचारी नसल्याने तीही बिनभरवशाचीच झाली आहे.

नेरुळ पूर्व विभागात शिरवणे, दारावेसारखी मूळ गावठाणे, तर शिवाजीनगरसारखा झोपडपट्टीचा परिसर या विभागात येतो.

सिडको वसाहतीत राहणाऱ्या व उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या परिसराचा भागही नेरुळ पूर्व विभागात येत असून गावठाणांच्या मूलभूत समस्या कायम आहेत. डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियम तसेच विविध शिक्षण संकुल व मॉलमुळे नेरुळ, सीवूडस रेल्वे स्थानके सातत्याने गजबजलेली असतात. मात्र पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. नेरुळ पूर्व भागात शहरातील रॉक गार्डन, वंडर्स पार्कसारखी मोठी व देखणी उद्याने आहेत. मात्र उद्यानांबाहेर पार्किंगची गैरसोय होत आहे. मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत वसाहतीत रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात.

‘वंडर्स पार्क’ शहराचे वैभव

नवी मुंबईचे आकर्षणाचे ठिकाण असलेले वंडर्स पार्क सर्वाच्याच आवडीचे ठिकाण आहे; परंतु येथील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. देखभाल दुरुस्तीची कामे काढली असून नव्याने येथे पार्कमध्ये खेळणी तसेच कारंजी बसवली जाणार आहेत.

विज्ञान केंद्र रखडले

पालिकेचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेला विज्ञान केंद्र याच प्रभागात होणार आहे. मात्र हा प्रकल्प निविदांच्या फेऱ्यात अडकला आहे. नवी मुंबईत विज्ञान केंद्र कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

विद्यमान नगरसेवक

* प्रभाग क्रमांक  ८० : कविता चंद्रकांत आगोंडे (भाजप)

* प्रभाग क्रमांक ८१: जयवंत दत्तात्रेय सुतार (भाजप)

* प्रभाग क्रमांक ८८ : शिल्पा सूर्यकांत कांबळी (भाजप)

* प्रभाग क्रमांक ८९: ज्ञानेश्वर नारायण सुतार (शिवसेना)

* प्रभाग क्रमांक ९०: मीरा संजय पाटील (काँग्रेस)

* प्रभाग क्रमांक ९१: नेत्रा आशीष शिर्के (भाजप)

* प्रभाग क्रमांक ९२: सुनील बाळाराम पाटील (भाजप)

* प्रभाग क्रमांक ९९: सलुजा संदीप सुतार (भाजप)

* प्रभाग क्रमांक १००: रवींद्र उद्धव इथापे (भाजप)

पक्षांतरामुळे चुरस

नवी मुंबईचे महापौर असलेल्या जयवंत सुतार यांचा प्रभागही महिलेसाठी आरक्षित झाला असून महापौरांनाच नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. महापौरांच्याच मूळ गावात शिवसेनेचे ज्ञानेश्वर सुतार यांचा प्रभाग, दारावे गावातील सुनील पाटील व सभागृह नेते रवींद्र इथापे यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे यांच्याच घरातील महिलेला संधी मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे महिला नगरसेविकांचे प्रभाग पुरुषांसाठी आरक्षित झाल्याने आता त्या ठिकाणी घरातीलच उमेदवाराला संधी मिळेल असे चित्र बहुतांश प्रभागांत पाहायला मिळत आहे. नेरुळ पूर्व विभागात ९ प्रभागांपैकी भाजपच्या एक नगरसेविकेने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे, तर दुसरी एक नगरसेविका शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहे.  या पक्षांतरामुळे चुरशीच्या लढती होणार आहेत.

प्रभागांच्या समस्या घरोघरी नळ कधी?

प्रभाग ८० हा भाग शिवाजीनगर, गांधीनगर झोपडपट्टीचा परिसर आहे. सार्वजनिक शौचालये, गटारे, पथदिवे यासह विविध कामे झाली असली तरी अद्याप घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे सार्वजनिक नळावरूनच पाणी भरावे लागत आहे.

ना मैदान, ना उद्यान

प्रभाग क्रमांक ८१ मध्ये गाव व गावठाण विस्तारचा मोठा भाग येतो. या भागामध्ये टिंबर मार्केट तसेच गॅॅरेजची दुकाने आहेत. त्यामुळे रस्त्यावरच पार्किंग पाहायला मिळते. गावाला ना मैदान, ना उद्यान आहे. शिरवणे शाळेसमोर असलेल्या मैदानामध्ये सातत्याने वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे मैदान शाळेसाठी की पार्किंगसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शीव-पनवेल महामार्गावरून रस्ता ओलांडताना अपघात होऊ  नयेत म्हणून भुयारी मार्ग आहेत. पालिकेने अर्धवट स्थितीतील भुयारी मार्गासाठी लाखो रुपये खर्च केले; पण हे भुयारी मार्ग कुलूपबंद आहेत.

स्कायवॉक गरजेचा

प्रभाग क्रमांक ८८ मध्ये वाचनालय, उद्यान व दैनंदिन बाजार ही महत्त्वाची अनेक कामे झाली आहेत; परंतु याच प्रभागात पालिकेचे मोठे रुग्णालय असले तरी सेवा मिळत नसल्याने नाराजी आहे. सेंट अगस्टीन ते नेरुळ डेपोपर्यंत स्कायवॉक गरजेचे आहे. डेपोसमोर भाजी मंडई आहे; परंतु येथे राजकीय वरदहस्ताने फेरीवाल्यांनी ताबा घेतलेला आहे. याचे भाडे कोण घेते? याचा शोध पालिकेने लावून हा भूखंड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी होत आहे.

आदिवासीच्या घरांचा प्रश्न प्रलंबित

प्रभाग क्रमांक ९० मध्ये विविध पायाभूत सुविधांची कामे झाली असून अहिल्याबाई होळकर समाज मंदिर, आमराई उद्यान, नवीन पंपहाऊस, आंबेडकर उद्यान यांची सुधारणा झाली आहे. मात्र आदिवासींच्या घरांचा प्रश्न प्रलंबितच आहे.

‘डॉग पार्क’ कागदावरच

प्रभाग क्रमांक ९१ हा मोठमोठय़ा सोसायटय़ा, एसबीआय कॉलनी तसेच विविध खासगी सोसायटय़ांचा परिसर आहे. येथे पदपथ, रस्ते, उद्याने, दुर्गंधीयुक्त नाल्याचे काँक्रीटीकरण, रेणुकाचार्य उद्यानात वेगळेपण जपणारी क्लायबिंग वॉल तयार करण्यात आली आहे. मात्र ‘डॉग पार्क’ करण्याचा प्रयत्न अजून प्रत्यक्षात आला नाही.

बेकायदा झोपडय़ा व भंगारवाल्यांचा वेढा

प्रभाग क्रमांक ९२ मध्ये दारावे गाव सेक्टर २१ व १९ चा भाग येत असून गावातील बकालपण आहे तसेच आहे. गावाला बेकायदा झोपडय़ा व भंगारवाल्यांचा वेढा आहे. नागेश्वर तलावाची दुरुस्ती सुरू असून स्केटिंग पार्क अद्याप सुरू करण्यात आले नाही.

रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग

प्रभाग क्रमांक १०० मध्ये भीमाशंकर सोसायटीसह उच्चभ्रू सोसायटय़ा आहेत. या परिसरात असलेला दुर्गंधीयुक्त नाल्याचे काँक्रीटीकरण केले आहे. याच प्रभागात शहराचे आकर्षण असणारे वंडर्स पार्क, आर.आर. पाटील उद्यान आहे. मात्र प्रभागात पार्किंग रस्त्यावर दुतर्फा पाहायला मिळते.

शिरवणे गाव व परिसरात मोठय़ा प्रमाणात लेडीज सव्‍‌र्हिस बार, लॉज आहेत. त्यामुळे बारबालांची भाडय़ाने राहणाऱ्यांची संख्या खूप आहे. महिलांनी सह्य़ांची मोहीम राबवत पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करूनही हे धंदे राजरोसपणे चालतात. त्यामुळे शिरवणे गावाची बदनामी होत आहे. आमच्या महिला भगिनी सुरक्षितपणे वावरू शकत नाहीत.

– दिनेश ठाकूर, उपाध्यक्ष शिरवणे ग्रामविकास युवा मंच

झोपडपट्टी भागात अभ्यासिकेसाठी जागा दिली पाहिजे. शाळेव्यतिरिक्त इतर वेळेत मुलांना क्रीडांगण खेळायला देतात; पण शिवाजीनगरसारख्या परिसरात खेळायला जागा आहे कुठे? या परिसरात पालिकेने मैदान, उद्यान उपलब्ध करून दिले पाहिजे.

– गणेश शेळके, अध्यक्ष, शिवआधार संस्था

नवी मुंबई महापालिकेने करोडो रुपये खर्चून आमच्या नेरुळ उपनगरात सार्वजनिक रुग्णालयासाठी टोलेजंग इमारत उभारली; पण त्यामध्ये सुविधा कुठे आहेत? सुविधा नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. फुटबॉलसारखे क्रीडांगण कबड्डीसाठीही उभारावे.

– आनंद पावले, नागरिक, नेरुळ

नवी मुंबई राहण्यासाठी अतिशय छान व सुंदर शहर आहे; पण या शहरातही पार्किंगची मोठी अडचण आहे. नेरुळ विभागात सगळ्या रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी असतात. पालिकेने बहुमजली पार्किंगची सोय सर्वच उपनगरांत करायला हवी.

– योगेश तरडे, नागरिक, नेरुळ

आठवडा बाजारामुळे रविवार वाहतूक कोंडीचा

शिरवणे हे नवी मुंबईतील मूळ गावठाणातील मोठे गाव. येथे रविवारी आठवडा बाजार भरत असून यामुळे रविवारचा दिवस वाहतूक कोंडीचा असतो. प्रभाग क्रमांक ८९ मध्ये मूळ गावठाणाचा भाग येत असून गावातील पदपथ, गटारे अशी विविध कामे झाली आहेत. उच्चस्तरीय जलकुंभाअभावी पाणीसमस्येला सामोरे जावे लागते. गावाला भौगोलिक स्थितीमुळे खेळासाठी मैदान तसेच उद्यान नसून महापालिकेच्या शाळेवर सातत्याने वाहने उभी केली जातात. वारंवार तक्रारी करूनही गावामधील बार व लॉज सुरूच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.