|| विकास महाडिक

नवी मुंबईच्या दक्षिण भागातील रेल्वेचा प्रवेश उरण पट्टय़ाच्या नागरीकरणाला बळ देणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली नेरुळ-उरणदरम्यानची लोकलसेवा अर्धवट का होईना अखेर सुरू झाली आहे. लोकलसेवा येणार, या आशेवर आतापर्यंत विकसित होत असलेला हा परिसर रेल्वेच्या प्रत्यक्ष आगमनाने झपाटय़ाने कायापालट करेल, यात शंका नाही. त्याच प्रकारे अन्य पायाभूत सुविधांचा विकास झाला तर, हा संपूर्ण पट्टा नागरीकरणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल.

महामुंबईच्या सर्वागीण विकासासाठी रेल्वे सेवेचे जाळे आवश्यक असल्याचे जाणून सिडकोने मे १९९२ मध्ये पहिल्यांदा मानखुर्द वाशी रेल्वेसाठी पुढाकार घेतला. रेल्वे म्हटले म्हणजे भारतीय रेल्वे. लोकप्रतिनिधींचा रेटा आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या मनात येईल तोपर्यंत रेल्वे एखाद्या भागात जाण्याचा प्रश्न येत नाही. नवी मुंबईत रेल्वे जाळे विणले जावे यासाठी सिडकोने पुढाकार घेतलेला आहे. त्यासाठी एकूण खर्चातील ६७ टक्के खर्चाचा भार सिडकोने उचलेला आहे. भारतामध्ये एखाद्या महामंडळाने रेल्वे प्रकल्पांसाठी पुढाकार घेतलेले हे पहिलेच उदाहारण आहे. त्यामुळेच मानखुर्दपर्यंत मर्यादित असलेली रेल्वे २६ वर्षांपूर्वी नवी मुंबईत डेरेदाखल होऊ शकली. इतक्या लवकर नवी मुंबईत रूळ टाकण्याचे भारतीय रेल्वे प्रशासनाच्या ध्यानीमनीदेखील नव्हते. नवी मुंबईचा झपाटय़ाने विकास आवश्यक असल्यास रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नाही. हे सिडकोला माहीत होते. त्यामुळेच खर्चाचा मोठा भाग देऊन सिडकोने मानखुर्द-वाशी रेल्वे सुरू करण्यास हातभार लावला. त्यानंतर फेब्रुवारी १९९३ मध्ये हीच रेल्वे पुढे पुढे सरकत बेलापूपर्यंत गेली आणि त्यानंतर जून १९९८ मध्ये तीन पनवेल गाठले. याच वेळी ठाणे ते तुर्भे ही उत्तर बाजूकडील रेल्वे सेवा सुरू झाली. त्यामुळे वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि वाशी ते ठाणे हा चतुष्कोन तयार झाला. महामुंबईच्या विकासाला गती देणारा रेल्वेचा हा चतुष्कोन महत्त्वाचा ठरला.  नवी मुंबईच्या जमिनींना सोन्याचा भाव येण्याचे प्रमुख कारण ही रेल्वेसेवा आहे. त्यानंतर रविवारी सुरू झालेला नेरुळ ते खारकोपर हा उरणकडे जाणारा अर्धा रेल्वे मार्ग दक्षिण नवी मुंबईच्या विकासाची नांदी ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच्या वसाहती (संस्कृती) ह्य़ा पाण्याचे स्तोत्र पाहून वसविल्या जात होत्या पण आता दळणवळणाची साधणे बघून लोकसंस्कृती विस्तारत असल्याचे म्हटले आहे. ते महामुंबईतील रेल्वे जाळेने सिद्ध केलेले आहे. पनवेल ही तशी ब्रिटिशकालीन बाजारपेठ आहे. त्यामुळे जहाज, गलबते यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये पहिल्यापासून बाजारहाट होत आहे पण उरण हा भाग तसा जवाहरलाल नेहरू बंदरच्या विकासानंतर (जेएनपीटी) जगाच्या नकाशावर अधोरेखित झालेला आहे. त्यामुळे सागरी वाहतुकीसाठी देशात काही काळातच अव्वल ठरलेला हा भाग रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने दुर्लक्षित होता. रविवारपासून सुरू झालेल्या नेरुळ-खारकोपर या १५ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाने या भागाला एक अन्यन्यसाधारण महत्त्व आले आहे.  या मार्गात असलेल्या सिडकोच्या उलवा या शहरी भागाला रेल्वे सुरू झाल्यानंतर झळाळी आली आहे. येथील घर आणि जमिनींचे दर एका दिवसात वाढलेले आहेत. नवी मुंबईच्या दक्षिण बाजूस रेल्वेचे हा शिरकाव येथील चित्र पलटवून टाकणारे आहे. याच भागातील द्रोणागिरी या क्षेत्रातील विकास या रेल्वेमुळे आता वेगाने होणार आहे.

या दोन सिडको नोड व्यतिरिक्त उरण क्षेत्राचा विकास या रेल्वेच्या वाहतुकीमुळे वाढणार आहे. नवी मुंबईतून उरण भागाला जोडणारी ही रेल्वे पुढील वर्षी उरणच्या शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहे. जमीन संपादन आणि खारफुटीचे काही प्रश्न या मार्गात अडथळा ठरले आहेत. काही वर्षांनी शिवडी-न्हावा शेवा या २२ किलोमीटर अंतराच्या सागरी सेतूचे काम सुरू झाले असून रस्ते मार्गाने उरण मुंबईला अतिशय जवळ जोडली जाणार आहे. त्यामुळे जलवाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही महत्त्वाची दळणवळणाच्या साधनांनी उरण हे नवी मुंबईतील पहिला तालुका जोडला जात असून तो जलद, सुरक्षित आणि स्वस्त वाहतूक मार्ग ठरणार आहे. त्यामुळेच हा भाग झपाटय़ाने विकसित होणार आहे.

रविवारची रेल्वेसेवा ही या दक्षिण भागाच्या विकासाची नांदी ठरणार आहे. याशिवाय याच भागातून १०६ किलोमीटर अंतराची वसई-विरार अलिबाग कॉरिडोअर सेवा सुरू येत्या काळात होणार आहे. हा मार्ग याच भागातून पुढे अलिबागला जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना क्षेत्र, नवी मुंबई मेट्रो, परवडणाऱ्या घरांचे खासगी प्रकल्प, बाळगंगा, हेटवणे धरण, या प्रकल्पामुळे पाणी-वीज रस्ते या पायाभूत सुविधांची गरज या भागात येत्या काळात पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईपेक्षा हे क्षेत्र अधिक वेगाने विकसित होणार आहे.

एसईझेड प्रकल्प रद्द झाल्याने या भागात त्या जामिनींवर गृहप्रकल्प उभे राहणार असल्याने पाच लाखांपेक्षा जास्त घरांची निर्मिती या क्षेत्रात होत आहे. रेल्वेचे अतिरिक्त जाळे निर्माण होत असल्याने महामुंबईत राहण्यास येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.  यानंतर पनवेल ते उरण हा रेल्वे मार्गदेखील प्रस्तावित आहे. एमएमआरडीएचा भाग असलेले हे महामुंबई क्षेत्र येत्या काळात मुंबईला पण मागे टाकणारे ठरणार आहे.

जलद आणि स्वस्त मार्ग

जलवाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही महत्त्वाची दळणवळणाच्या साधनांनी उरण हे नवी मुंबईतील पहिला तालुका जोडला जात असून तो जलद, सुरक्षित आणि स्वस्त वाहतूक मार्ग ठरणार आहे. त्यामुळेच हा भाग झपाटय़ाने विकसित होणार आहे.