सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर; राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी गृहित धरली जाणार
नवी मुंबई शहरातील अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करून शहराचा नावलौकिक उंचावत आहेत. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याच्या प्रस्तावाला सोमवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. या मदतीसाठी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी गृहीत धरली जाणार आहे.
जागतिक स्तरावरील जलतरणपटू, गिर्यारोहक, सायकलवर जगप्रवास, शिडाच्या होडीतून समुद्र प्रवास, पॅराग्लायडिंग, पॅराजम्पिंग या क्रीडा प्रकारांसाठी हे साहाय्य दिले जाईल. जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी कित्येक वेळा आर्थिक अडचणी येतात. अनेक खेळाडू केवळ त्यामुळे यशापासून वंचित राहतात. त्यामुळे जगभरात मान्यता असलेले साहसी खेळ खेळणाऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.
पॅराग्लायडिंग, पॅराजम्पिंग –
एअरो क्लब ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या निकषांनुसार पॅराग्लायडिंग व पराजम्पिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यास ४० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.
गिर्यारोहण – अतिउंचीवरील व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकित शिखरांची चढाई करणाऱ्यास ४० हजार तर देशांतर्गत गिर्यारोहण करणाऱ्यास २० हजार रुपये साहाय्य देण्यात येणार आहे.
सायकलवर जगप्रवास – सायकलवर जगप्रवास करण्यासाठी ४० हजार रुपये तर देशांतर्गत प्रवास करणाऱ्यास २० हजार रुपये देण्यात येणार आहेत.
जलतरण – जलतरणपटूंसाठी जागतिक स्विमिंग असोसिएशनने निर्धारित केलेले ७ समुद्र व खाडय़ा पोहण्याकरिता खेळाडूला वर्षांतून एकदाच ४० हजार रुपये तर २१ कि. मी.पेक्षा अधिक अंतर पार करणाऱ्या तसेच अखिल भारतीय सागरी जलतरण स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या पहिल्या तीन खेळाडूंना २० हजार रुपये आर्थिक साहाय्य मिळणार आहे.
शिडीच्या बोटीतून जगभ्रमंती – यासाठी ४० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 3:33 am