अस्ताव्यस्त पसरल्यामुळे पायाभूत सुविधा देणे कठीण

नवी मुंबई नवी मुंबई पालिकेचा विकास आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून तो तयार करताना त्यात शहरातील २९ गावांचे आरेखन करताना नियोजन विभागाला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवी मुंबईतील सर्व गावांचा विकास हा अस्ताव्यस्त आणि असमतोल झाला आहे. त्यामुळे गावांच्या हद्दी निश्चित करताना पायाभूत सुविधांची फार मोठी अडचण निर्माण होणार आहे.

नवी मुंबई पालिकेचा स्वतंत्र विकास आराखडा नाही. सिडकोने ४० वर्षांपूर्वी तयार केलेल्या विकास आराखडय़ावर पालिकेचे कामकाज सुरू आहे. सर्वसाधारपणे कोणत्याही पालिकांना पहिल्या २० वर्षांत शहराचा विकास आराखडा तयार करणे क्रमप्राप्त असते. मात्र नवी मुंबई पालिका स्थापनेला २७ वर्षे झाली तरी शहराचा विकास आराखडा अद्याप तयार झालेला नाही. विद्यमान जमीन वापर सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. अनधिकृत बांधकामे अधोरेखित झाली आहेत. आता शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात गावठाण व गावठाण विस्तार हे मोठे अडथळे ठरत आहेत. नवी मुंबईत पालिका क्षेत्रात एकूण २९ गावे असून ही गावे सिडको किंवा पािलका स्थापनेपूर्वीची आहेत. त्यामुळे या गावामध्ये जमिनीचा प्रत्येक  तुकडा वापरण्यात आलेला आहे. गावातील विकास हा अस्ताव्यस्त आणि असमतोल झाला आहे. त्यामुळेच राज्य सरकारने या गावांसाठी चार वर्षांपूर्वी समूह विकास योजना जाहीर केली होती. त्याला प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला व ही योजना गावांमध्ये अस्तित्वात येऊ नये यासाठी जनजागृती केली. या योजनेचे समर्थक माजी मंत्री गणेश नाईक यांना या योजनेला समर्थन दिल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत फटका सहन करावा लागला. त्यामुळे ही योजना सरकारला गुंडाळून ठेवावी लागली. त्यानंतर बेकायदा बांधकामांमुळे गावांत टोलेजंग इमारती कोणताही आराखडा तयार न करता उभ्या राहिल्या.

सध्या गावात ये-जा करण्यासाठी रस्ते राहिलेले नाहीत. त्यामुळे आपत्तीच्या काळात गावांमध्ये अग्निशमन व रुग्णवाहिका जाऊ शकत नाहीत, अशी स्थिती आहे. पालिकेच्या नियोजन विभागाला गावांचा विकास आराखडा तयार करताना रस्ते कुठे बांधावेत, वाहनतळाला कोणती जागा द्यावी, असे प्रश्न पडले आहेत. गावात जाणारे रस्ते एका विशिष्ट ठिकाणी संपुष्टात येत असून त्यापुढे जाण्याचे मार्ग खुंटत असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे किमान रस्ते तयार करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे.

चार महिन्यांत विकास आराखडा तयार करण्याचे आव्हान नियोजन विभागाने स्वीकारले आहे.

शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. विद्यमान जमीन वापर सर्वेक्षण झाले आहे. येत्या चार-पाच माहिन्यांत हा आराखडा तयार होणार आहे. गावातील गावठाण विस्तार आणि तेथील अस्ताव्यस्त विकास ही या आराखडय़ातील प्रमुख समस्या आहे. गावे ही या शहराच्या अगोदरची असल्याने येथील समस्या संवदेनशील आहेत. त्यामुळे हा आराखडा तयार करताना किमान रस्ते तरी निर्माण करावे लागणार आहेत. 

– ओवेसी मोमीन, संचालक, नगररचना विभाग, नवी मुंबई पालिका