News Flash

प्रभागांचा पंचनामा : सेंट्रल पार्क शोभेसाठी आहे का?

कोटय़वधी रुपये खर्च करून घणसोली सेंट्रल पार्क तयार करण्यात आले आहे.

महत्त्वाचे प्रकल्प रखडल्याने नाराजी; उद्यान, मैदानांची मागणी

घणसोली प्रभाग क्रमांक  ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६

पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई : सिडकोकडून तीन वर्षांपूर्वी घणसोली विभाग महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणच्या विकासकामांनी वेग घेतला आहे. मात्र अनेक प्रकल्प पूर्ण होऊनही ते नागरिकांच्या सेवेत येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. येथील महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल पार्क’ हे वर्षभरापूर्वीपासून तयार आहे, मात्र मूळ ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात पालिकेला अपयश आले आहे. त्याचप्रमाणे प्रभाग ३३ मध्ये उभारण्यात आलेले महिला सक्षमीकरण केंद्र तयार होऊनही बंद आहे. रात्र निवारा केंद्रही सुरू करण्यात आले नाही.

घणसोली विभाग हा अनेक वर्षे सिडकोकडेच होता. सिडको विकासक असल्याने महापालिकेने या विभागाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नवी मुंबईतील मध्यवर्ती व मोक्याचे ठिकाण असूनही घणसोली विभाग हा आजही नियोजित नवी मुंबईतील भाग वाटत नाही. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेत हा विभाग महापालिकेकडे हस्तांतरित केला. त्यानंतर कुठे या विभागात विकासकामांनी वेग घेतला आहे. गेल्या तीन वर्षांत अनेक प्रकल्प महापालिकेने हाती घेतले व त्यातील काही पूर्णही केले आहेत, मात्र ते उद्घाटनाविना पडून आहेत. या सातही प्रभागात नागरिकांसाठी ना उद्याने आहेत ना मैदाने. त्यामुळेही नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

कोटय़वधी रुपये खर्च करून घणसोली सेंट्रल पार्क तयार करण्यात आले आहे. वर्षभरापूर्वीच याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र त्याचे उद्घाटन होत नसल्याने ते नागरिकांना खुले होत नाही. या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर येऊन निराश होऊन नागरिकांना परत जावे लागत आहे. हे उद्यान जे  सावली गाव हटवून बांधले त्या गावाचे पुनर्वसन अद्याप बाकी आहे. आधी पुनर्वसन मगच प्रकल्प उद्घाटन अशी भूमिका सावली ग्रामस्थांनी घेतली आहे.

प्रभाग ३३ मध्ये पालिकेने महिला सक्षमीकरण केंद्र बांधले आहे. मात्र तेही गेली दोन वर्षे बंदच आहे. घणसोली सेक्टर ४ या ठिकाणी पालिकेने दोन कोटींहून अधिक रक्कम खर्च करीत तीन मजली रात्र निवारा केंद्र उभारले आहे. या केंद्राचे काम हे तीन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र त्याचे उद्घाटन झालेले नाही.

विद्यमान नगरसेवक

* प्रभाग क्रमांक ३० : द्वारकानाथ भोईर (शिवसेना)

* प्रभाग क्रमांक ३१ : सीमा गायकवाड (भाजप)

* प्रभाग क्रमांक ३२ : प्रशांत पाटील (शिवसेना)

* प्रभाग क्रमांक ३३ : उषा पाटील (भाजप)

* प्रभाग क्रमांक ३४ : कमल पाटील (शिवसेना)

* प्रभाग क्रमांक ३५ : दीपाली सकपाळ (शिवसेना)

* प्रभाग क्रमांक ३६ : सुवर्णा पाटील (शिवसेना)

विस्तारित पाम बीचमुळे विकासाला गती?

घणसोली ते ऐरोली हा विस्तारित पाम बीच मार्ग रखडलेला आहे. पालिकेने या ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. हा पूल झाल्यास येथील अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या महिन्यातील सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव आला होता. सिडकोने या पुलासाठी ५० टक्के रक्कम देण्याचे मान्य केले होते. मात्र त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर रक्कम देण्याचे कळविले आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया थांबली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात घणसोलीत पालिकेने आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी नियोजन केले आहे. येथील सेक्टर १३ येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल होणार आहे.

प्रभाग आरक्षणामुळे पालिकेत नवे चेहरे?

नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षणाने दिग्गजांच्या आशा मावळल्या आहेत. महिला आरक्षण आल्याने विद्यमान पुरुष नगरसेवकांची अडचण झाली आहे. शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांचा प्रभाग ३० मध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले आहे.

प्रभाग ३१ मध्ये अनुसूचित जमाती तर प्रभाग ३२ मध्ये अनुसूचित जाती महिला,प्रभाग ३४, ३६ हा सर्वसाधारण झाला असून प्रभाग ३३ व ३५ नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडले आहे.त्यामुळे विद्यमान नगरसेवकांऐवजी नवे चेहरे पालिकेत दिसतील.

नाला दुर्गंधी नकोशी!

प्रभाग ३२ मध्ये सेक्टर ६, ७, सिम्प्लेक्स, सी अँड डी, समर्थनगर, साई सदानंदनगर या प्रभागात रस्त्यांची कामे झाली आहेत, मात्र नाला दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. येथील नाल्याची वेळोवेळी सफाई केली जात नाही. तसेच नाला बंदिस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नाल्यात माती पडून गाळ साचतो. दुर्गंधी पसरते. डास वाढत असल्याने हा त्रास अस होत आहे.

येथील साई सदानंदनगर येथे फेरीवाल्यांनी रस्त्यावर ताबा घेतला आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे. बेकायदा बांधकामांचाही प्रश्न आहे. प्रभागात अमृत योजनेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले आहे, मात्र देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे.

तळवली रस्ता पूर्णत्वास

प्रभाग ३० मध्ये सेक्टर १३ घणसोली, तळवली, नवघर आणि कोळ्यांची आळी हा भाग येतो. या प्रभागातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सीआरझेडमध्ये तळवलीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडले होते, तो रस्ता आता पूर्ण करण्यात आलेला आहे. प्रभाग ३१ मध्ये मोरेश्वरनगर, जिजामातानगर, आदिशक्तीनगर, चिंच आळी, रामकरनगर हे विभाग येत असून रस्ते, पदपथांची समस्या कायम आहे.

रस्ते अंधारात

प्रभाग ३३ मध्ये सेक्टर ५, ६चा काही भाग व सेक्टर ४चा काही भाग येतो. या प्रभागातील पुलाचे काम होत नसल्याने येथील नागरिकांना मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी गैरसोय होत आहे. या भागात पथदिवे नसल्याने रस्त्यांवर अंधार असतो. सिडकोने नियोजन करताना वाहनतळाची सुविधा न केल्याने पार्किंग समस्या गंभीर होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत.

रुग्णालयाचा भूखंड नावापुरताच

प्रभाग ३४ मध्ये सेक्टर ७ तसेच सिम्प्लेक्समधील एफ, एच आणि ई हा भाग येतो. हा नवी मुंबई शहरातील सर्वात छोटा प्रभाग आहे. येथील रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे, शाळा आहे, परंतु शाळेत चांगल्या सुविधा पुरवल्या जात नसल्याची तक्रार आहे. या प्रभागात रुग्णालयासाठी भूखंड आरक्षित आहे, मात्र सिडकोकडून तो अद्याप हस्तांतरित करण्यात आला नाही.

स्थानकाबाहेर ‘कोंडी’

प्रभाग ३६ मध्ये सेक्टर २, ३ व ४चा काही भाग येतो. हा प्रभाग घणसोली रेल्वे स्थानकाच्या मुख्य रस्त्यालगत आहे. या ठिकाणी एकच रस्ता असून नागरिकांची व वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ देखील शिल्लक नाहीत. त्यामुळे वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागत आहे. रेल्वे स्थानक परिसरात दुपदरी रस्ता करण्याची मागणी होत आहे.

कंडोनियम अंतर्गत कामांकडे दुर्लक्ष 

प्रभाग ३५मध्ये घरोंदा व सेक्टर ९ येते. या प्रभागात अमृत योजनेअंतर्गत मोठय़ा प्रमाणत वृक्षारोपण करण्यात आले आहे. एक हजार सुपारीची झाडे लावण्यात आली आहेत. मात्र येथील गृहसंकुलात कंडोनियम अंतर्गत कामे झाली नाहीत.

गेली १५ वर्षे हा विभाग विकासापासून वंचित होता. आता कुठे रस्त्यांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी सेंट्रल पार्क उभारले आहे, मात्र त्यात प्रवेश मिळत नाही. या विभागासाठी पालिकेची स्वतंत्र आरोग्य सेवा नाही.

-गणपत डोळे

या प्रभागात पार्किंगची समस्या गंभीर आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. नाल्यांची वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी नकोशी होत आहे.

-स्वाती देशमुख

सिम्प्लेक्स येथील पुलाचे काम झालेले नाही. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असतो. पदपथ, रस्त्याची कामे सुरू आहेत. विभाग नेहमीच अंधारात असतो. या ठिकाणी पथदिवे लावणे गरजेचे आहे.

-मुकुंद खोपडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 2:19 am

Web Title: development work in ghansoli navi mumbai municipal corporation election zws 70
Next Stories
1 १८ तासांत गुन्ह्य़ाचा तपास
2 खारघर, तळोजात प्रदूषणावरून संभ्रम
3 सिडकोकडून आणखी एक लाख घरे
Just Now!
X