मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा

माफक दर, तात्काळ सेवा आणि दर्जेदार सुविधा या तिन्ही गोष्टींमध्ये आरोग्य सेवा एकरूप झाली तर ती चांगली परिणामकारक होईल. येत्या काळात शहरी भागांबरोबर ग्रामीण भागातील जनतेलाही चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य सेवेला जोडले जाणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपोलो रुग्णालयाच्या नवी मुंबई शाखेच्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी केले. अत्याधुनिक दर्जेदार रुग्णालयांची होणारी वाढ ही लोकांच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून डिजिटल वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आरोग्य सेवा ही लोकांपर्यंत नेणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

या वेळी राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब विकास मंत्री डॉ. दीपक सावंत उपस्थित होते. नवी मुंबईत जागतिक दर्जाच्या रुग्णालये असली तरी नव्याने सुरू झालेले अपोलो रुग्णालय हे त्या श्रेणीतील ६६ वे रुग्णालय आहे.  भविष्यात आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी कौशल्य विकास योजनेखाली गरजूंना आरोग्यविषयीचे शिक्षण पुरवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, तर मागील वर्षभरात १० हजार गरजू व्यक्तींना मुख्यमंत्री निधीतून आरोग्याच्या अनेक समस्यांवर मदत केल्याचे स्पष्ट केले. अपोलो रुग्णालय हे नवी मुंबईतील सर्वात अद्ययावत रुग्णालय असून नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा या रुग्णालयाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे पूर्ण होऊ शकतील.  लोकांना या जागतिक दर्जाच्या सेवेचा फायदा होणार असून जगभरातील नागरिकांना उपचारांसाठी नवी मुंबईत येण्याची प्रेरणा या रुग्णालयामधून मिळणार आहे, असेही ते म्हणाले.