News Flash

महामुंबईच्या गतिमान विकासाचे लक्ष्य

मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; नेरूळ-खारकोपर उपनगरीय रेल्वेसेवेचे उद्घाटन  

नेरुळ ते उरण रेल्वे मार्गावरील पहिल्या टप्प्यातील नेरुळ/ बेलापूर ते खारकोपर या उपनगरीय सेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.   (छाया-नरेंद्र वास्कर)

मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; नेरूळ-खारकोपर उपनगरीय रेल्वेसेवेचे उद्घाटन  

आता फक्त मुंबई नव्हे, तर मुंबई, नवी मुंबई, रायगडसह संपूर्ण एमएमआरडीए परिसरात वेगवान दळणवळण सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यासाठी प्रभावी विकासाचे नियोजन व ध्येय समोर ठेवले आहे. त्यामुळेच संपूर्ण महामुंबई क्षेत्रात प्रभावी ‘मोबिलिटी’ विकसित करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नेरूळ-खारकोपर उपनगरीय रेल्वेसेवेच्या उद्घाटनप्रसंगी दिली.

देशात रेल्वेसह विविध प्रकल्प उशिरा पूर्ण होण्याची परंपरा होती. परंतु २००५ ते २०१४ च्या कालावधीनंतर प्रथमच देशात गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्य सरकारने विकासाचा वेग अनेक पटीत वाढल्याचा दावाही त्यांनी केला. नेरूळ ते उरण रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील नेरूळ/ बेलापूर ते खारकोपर या उपनगरीय सेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. सोमवारपासून ही सेवा नियमित सुरू होणार आहे.

पनवेल हे भविष्यातील महत्त्वाचे टर्मिनस ठरणार असून त्यादृष्टीने  नियोजन केल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नेरूळ-उरणचा दुसरा टप्पा डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केला जाईल, असे गोयल यांनी सांगितले. केंद्र व राज्याच्या  समन्वयातून रेल्वेला विकासाचे दुहेरी इंजिन लागले आहे. उपनगरीय सेवेसाठी ४० वातानुकूलित रेल्वेगाडय़ांचा कार्यादेश देण्यात आला असून आगामी काळात २०० वातानुकूलित रेल्वेगाडय़ा घेण्यात येतील, असेही ते म्हणाले.

नवी मुंबई विमानतळाच्या ‘डेडलाइन’ची चिंता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नना प्रकल्पाच्या दृष्टीने समग्र दळणवळण प्रकल्प आराखडा तयार केला असून नियोजन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीनेही वेग घेतला आहे. येथील प्रकल्पग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी सिडको अध्यक्षांनी योग्य नियोजन करून प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेतल्यास नवी मुंबई विमानतळावरून होणाऱ्या पहिल्या उड्डाणाची ‘डेडलाइन’ पाळता येईल. अन्यथा, पहिल्या विमानाची टेकऑफची डेडलाइन ‘डेड’ होऊन जाईल.

दीड लाख घरांची घोषणा

सिडकोमार्फत नवी मुंबईत रेल्वे स्थानकांच्या परिसरात ४० हजार तर नवी मुंबई व परिसरातील खदानींच्या परिसरात एक लाख घरांची निर्मिती केली जाईल. स्थानिक प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करणे व क्लस्टर विकास योजनांबाबत लवकरच अधिसूचना काढली जाईल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 1:17 am

Web Title: devendra fadnavis in navi mumbai
Next Stories
1 विमानतळ उभारणीत पक्ष्यांच्या अधिवासाचा अडथळा?
2 नेरुळ-खारकोपर लोकल सोमवारपासून
3 ई-लिलावाविषयी संभ्रम
Just Now!
X