पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपजून सभारंभात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी व्यक्तिश: लक्ष घालणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात त्यांचे वाक्चातुर्यदेखील दिसून आले. वास्तविक पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण परवानगी मिळालेल्या या प्रकल्पाच्या आठही परवानग्या पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे सांगून फडणवीस यांनी पंतप्रधानांना खूश केले. याच वेळी प्रकल्पग्रस्तांचा त्याग, प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, यांच्या उल्लेखासह सिडकोचे आजी-माजी दोन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आणि भूषण गगराणी यांच्या कामाची प्रशंसा करून मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या भूमिपजूनाचे श्रेय या सर्वाना दिले.

नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आठ महत्त्वाच्या परवानग्यांची आवश्यकता होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात या प्रकल्पाला केंद्र सरकारची पहिली परवानगी मिळाली. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात त्याचा आर्वजून उल्लेख केला आणि या प्रकल्पाचा शुभारंभ आणि उद्घाटन आपले सरकार करेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या या पंतप्रधानांच्या व्हिडीओ कॉन्फरसिंगमुळे मिळाल्या असून एक परवानगी मिळाली नाही म्हणून पंतप्रधानांनी लागलीच विचारणा केल्याची आठवण देखील सांगितली. विमान प्राधिकरणाच्या मंजुऱ्या देण्यासाठी नागरी उड्डाणमंत्री राजू गजपती यांनी कसे सहकार्य केले हे सांगण्यासही मुख्यमंत्री विसरले नाहीत. प्रकल्पग्रस्तांनी स्वखुशीने दिलेल्या जमिनीवरच हा प्रकल्प उभा राहात असून दिवगंत प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील यांचा समन्वय आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला.

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना राजशिष्टाचार नसताना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. कार्यक्रमाला आलेल्या त्यांच्या हजोरा कार्यकर्त्यांना त्यामुळे आनंद झाला होता. निमंत्रण पत्रिकेवर नाव नाही म्हणून रुसून बसलेल्या खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार मनोहर भोईर यांची समजूत काढताना त्यांनाही व्यासपीठावर दोन आसने राखीव ठेवण्यात आली होती. ही बैठक व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून केली होती असे

समजते. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना तर हेलिपॅडवर पंतप्रधानांचे स्वागत करण्याचा मान शेवटच्या क्षणी देण्यात आला. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी जमीन संपादनात महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर विद्यमान व्यवस्थाकीय संचालक भूषण गगराणी यांनी सर्व अडथळ्यांवर मात करून विमानतळाच्या कामांना सुरुवात केली. त्यांच्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले. त्यामुळे भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा होती.