यंदा मोसम बहरणार; आंब्याला घाऊक बाजारात चांगली सुरुवात

नवी मुंबई अक्षय तृतियापर्यंत वाट न पाहणाऱ्या कोकणच्या हापूस आंबा बागायतदारांनी मुंबई व पुणे येथील घाऊक बाजारात हापूस आंबा पाठविण्यास सुरुवात केली असून दररोज सरासरी पाच ते दहा हापूस पेटय़ा बाजारात विक्रीसाठी येत आहेत. त्यांचा दरही तेवढाच असून पाच डझनाची एक पेटी चार ते सात हजार रुपयांच्या घरात विकली जात आहे.

आठ दिवस ही पेटी रायपलिंग चेंबरमध्ये ठेवल्यानंतर हा हापूस आंबा खाण्याजोगा होत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या दक्षिण अफ्रिकेतील हापूस आंब्यामुळे खवय्यांच्या जिभेवर हापूस आंब्याची चव कायम आहे. कोकणात मोहर चांगला बहरला असल्याने यंदाचा मोसमही बहरणार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

काही वर्षांपूर्वी हापूस आंब्याची नैसर्गिक वाढ पूर्ण होऊन तो अक्षय तृतियाच्या मुहूर्तावर झाडावरून तोडला जात होता. अलीकडे हापूस आंबा व्यवसायात मोठय़ा प्रमाणात स्पर्धा सुरू झाली असून कल्टरचा प्रयोग करून हापूस आंब्याची लवकर कृत्रिम वाढ केली जाते. दिवाळीतच या प्रयोगातील पहिले हापूस आंबे मुंबई व पुण्याच्या घाऊक बाजारात पाठवून हापूस आंब्याच्या आगमनाची वर्दी दिली जाते, मात्र त्यानंतर ही आवक गायब होत असल्याचे दिसून येते. नवीन वर्षांच्या सुरुवातीसही आवक खऱ्या अर्थाने सुरू झाली असून दररोज पाच ते दहा हापूस आंब्याच्या पेटय़ा बाजारात येत आहेत. साडेचार ते सहा डझनाच्या या पेटय़ा साडेचार ते सात हजार रुपये किमतीला विकल्या जात आहेत. कोकणात थंडीचा कडाका सुरू असून हापूस आंब्याची फळधारणा पुरेशी धरलेली नाही. ऑक्टोबर हिटमुळे तयार झालेला हापूस आंब्याची तुरळक आवक सुरू झाली आहे. फेब्रुवारीच्या माध्यान्हापासून ही आवक जोरात सुरू होणार आहे. रविवारी घाऊक बाजार बंद असणार आहे. त्यानंतर सोमवारी ही आवक वाढण्याची शक्यता आहे. यंदा मोसम चांगला होईल असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. हापूस आंब्यावरील मोहर बघून बागा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या घाऊक बाजारात मोठी आहे.

कोकणातील देवगडचा हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे. त्याची आवक सुरू झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या पाच ते सहा डझन हापूस आंबे बाजारात येत आहेत. त्यांची आवक फेब्रुवारी मार्चनंतर वाढणार आहे. यंदाचा मोसम व्यापाऱ्यांसाठी आशादायक आहे.

– संजय पानसरे, माजी संचालक, घाऊक फळ बाजार, एपीएमसी