परराज्यांतून मोठय़ा प्रमाणात आंब्याची आवक; दरांत मोठी घसरण

नवी मुंबई हापूस आंब्याच्या बागा अलीकडे कोकणात सर्वत्र तयार झाल्या असल्या तरी कातळावरील देवगडच्या हापूस आंब्याची गोडी इतर हापूस आंब्यांना येत नाही. देवगडच्या या लोकप्रिय हापूस आंब्याचा यंदाचा मोसम संपला आहे. आता राज्यातील रत्नागिरी, रायगड व परराज्यांतील गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथील आंब्यांची बाजारात आवक सुरू झाली आहे. त्यामुळे हापूस आंब्याचे दर गडगडले आहेत.

जानेवारी महिन्यापासून मुंबई, पुण्याच्या घाऊक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेला देवगड हापूस आंब्याचा मोसम आता अंतिम टप्प्यात आहे. सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस देवगडच्या हापूस आंब्याचा मोसम संपुष्टात येतो. मात्र यंदा मोसम काही दिवस अगोदरच संपत आला आहे. देवगडच्या हापूस आंब्याने बाजारातून ‘एक्झिट’   घेतल्यानंतर कोकणातील इतर भागांतून येणाऱ्या हापूसची आवक वाढली आहे. बाजारात सोमवारी ८५ हजार हापूस आंब्याच्या पेटय़ांची आवक झालेली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथील आंबाही बाजारात येऊ लागला असून त्याच्या ५० ते ६० हजार पेटय़ा बाजारात आल्या आहेत. देवगड हापूसइतकाच लोकप्रिय असलेल्या गुजरातच्या केसर आंब्याचीही आवक वाढली आहे. गुजरात व दक्षिण भारतातून सध्या हापूसबरोबरच बदामी, लालबाग आणि तोतापुरी या आंब्यांचीही आवक सुरू झाली आहे. एकाच वेळी कोकण आणि इतर राज्यांतून हापूस आंब्याची आवक घाऊक बाजारात वाढल्याने हापूस आंब्याचे दर जमिनीवर आले आहेत. कोकणातील आकाराने छोटय़ा छोटय़ा हापूस आंब्यांची एका डझनाची पेटी (बोनसाय) पन्नास ते सत्तर रुपये डझनाने उपलब्ध होऊ लागली आहे. यंदा पाऊस लवकर पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे बागायतदार आंबा लवकर बाजारात पाठवत असल्याचे समजते.

दोन वर्षांपासून कमी आवक

हवामान बदलामुळे मागील दोन वर्षांपासून हापूसच्या उत्पादनात घट झाल्यामुळे एपीएमसी बाजारातील आवक घटली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये मोठय़ा प्रमाणात हापूस दाखल झाल्यामुळे जूनपर्यंत हापूस मोठय़ा प्रमाणात बाजारात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र थंडी लांबल्याने हापूस देठावर काळवंडत होते तर कडक उन्हामुळे मोहर गळून पडत होता. त्यामुळे या वर्षी उत्पादनात घट झाली होऊन आवक निम्म्यावर आली. २०१७ मध्ये ११ लाख ३० हजार ६५७ क्विंटल आवक झाली होती. २०१८ मध्ये ८ लाख ८६ हजार १२१ क्विंटल झाली तर २०१९ मध्ये १५ मेपर्यंत आवक निम्म्यावर येऊन ४ लाख ८१ हजार १६१ क्विंटल आवक झाल्याची नोंद आहे.