News Flash

प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा, पोलिसांचा घेराव

दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याच्या मुद्दय़ावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे.

सिडको भवनापासून दोन किमी अलीकडेच आंदोलकांना रोखले

महामुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यंतून ४५ हजार प्रकल्पग्रस्त एकवटले

पोलीस बंदोबस्त, आंदोलकांच्या संयमामुळे आंदोलन शांततेत

नवी मुंबई : नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, याकरिता नवी मुंबई, पनवेल, उरणसह आसपासच्या जिल्ह्यंतील प्रकल्पग्रस्तांनी आयोजित केलेले आंदोलन गुरुवारी शांततेत पार पडले. सिडको भवनाला घेराव घालण्यासाठी भल्या सकाळपासून चालून आलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला पोलिसांनी व्यूहरचना करून सिडको भवनापासून दोन किमी अलीकडेच रोखून धरले. त्यानंतर त्याच ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत नामकरण आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत आणि निवडक शिष्टमंडळासह सिडको अधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदन देत आंदोलक माघारी परतले.

दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याच्या मुद्दय़ावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी गुरुवारी सिडको भवनला घेराव घालण्याचा इशारा देताना प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तसेच एक लाखाहून अधिक प्रकल्पग्रस्त या ठिकाणी जमतील, असा दावाही करण्यात येत होता. प्रत्यक्षात गुरुवारी आंदोलनस्थळी ४० ते ४५ हजारांचा जमाव गोळा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवनाला घेराव घातल्यास सरकारची नामुष्की होईल, या विचाराने पोलीस आयुक्त बिपिन सिंह यांनी आंदोलकांना सिडको भवनापर्यंत पोहोचू न देण्याच्या सूचना पोलिसांना केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी आंदोलकांना सिडकोपासून दोन किलोमीटर अंतरावर रोखून धरले. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस महासंचालकांनी मुंबई महानगर क्षेत्रातील कुमक व राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा पाठविल्या होत्या. त्यामुळे बेलापूरला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. आंदोलक नेत्यांनीही घेराव न घालण्याची हमी दिल्याने आंदोलनकर्त्यांना ?ोलिसांनी रात्री उशिरा जाहीर सभा घेण्याची अलिखित परवानगी दिली होती.  पनवेल तालुक्यातून येणाऱ्या सर्व आंदोलकांना खारघर येथून पायी पाठविले जात होते तर उरण येथील प्रकल्पग्रस्त वहाळ येथून पायी येत असल्याचे चित्र होते. नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण, डोंबिवली, मुंबई या एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व आंदोलक हे नेरुळ येथील तांडेल मैदानात किंवा पामबीच मार्गावर वाहने पार्क करून चालत सभास्थानी येत होते.   भाजपा व आरपीआयच्या पांठिब्यावर प्रकल्पग्रस्तांनी केलेले हे आंदोलन साखळी आंदोलनापेक्षा मोठे व लक्षवेधी होते. विमानतळाचे नामकरण न झाल्यास १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद करण्याचा इशारा या सभेत देण्यात आला. हा प्रकल्प केंद्र सरकारचा मानला जात आहे. त्यामुळे आता या प्रश्नात केंद्र सरकारच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.

कामे बंद पाडणार?

विमानतळ नामकरणासाठी छेडण्यात आलेल्या या आंदोलनात प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांभाळले असले तरी, त्यांचे वडील माजी खासदार रामशेठ ठाकूर हेही आंदोलनात अग्रस्थानी होते. ठाकूर यांनी गुरुवारी झालेल्या सभेत १५ ऑगस्टपर्यंत नाव न दिल्यास विमानतळाची कामे बंद पाडू, असा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, सिडकोने केलेल्या विमानतळपूर्व कामांमध्ये ठाकूर यांच्या बांधकाम कंपनीचा सहभाग मोठा होता. या विमानतळाचे मुख्य काम आता अदानी समूहाकडे गेले आहे. या उद्योगसमूहाशी भाजप नेत्यांची असलेली जवळीक जगजाहीर आहे. या पाश्र्वभूमीवर विमानतळाची कामे बंद पडणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

विमानतळ प्रकल्पाला नामकरणाचा संघर्ष यापूर्वी नव्हता. दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळ प्रकल्पाला मिळावे यासाठी जे नेते सध्या विरोधात आहेत, हेच राजकीय नेते यापूर्वी दि. बा. पाटील यांचेच नाव प्रकल्पाला देण्यासाठी आग्रही होते. प्रकल्पग्रस्तांसाठी केलेल्या कामांमुळे दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळ प्रकल्पाला मिळावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. आम्हा कुटुंबीयांची तीच इच्छा आहे. हा वाद राजकीय आहे.

-अभय दिनकर पाटील, (दि. बा. पाटील यांचे पुत्र)

करोनाला निमंत्रण?

आंदोलनासाठी एकाच ठिकाणी

सुमारे ३० हजारांचा जनसमुदाय एकवटल्यामुळे करोना संसर्गाचा धोका बळावला आहे. आंदोलनादरम्यान करोनाप्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले. अनेक आंदोलक विनामुखपट्टी फिरताना दिसत होते. सभास्थळी व्यासपीठावरून वारंवार अंतर नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. मात्र, प्रत्यक्ष व्यासपीठावरच नेतेमंडळी विनामुखपट्टी आणि अंतर नियम न पाळता गोळा झाल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 2:58 am

Web Title: diba patil navi mumbai police airport ssh 93
Next Stories
1 राज्य सरकारला नामांतरासाठी १५ ऑगस्टची मुदत
2 …तर विमानतळाचे काम बंद पाडू!
3 ऐनवेळी सभेला परवानगी दिल्याने पामबीच मार्गावर खोळंबा
Just Now!
X