दिघ्यातील ब्रिटिशकालीन धरणातील पाणी वापरास मंजुरी मिळाल्यानंतरही अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी १ एप्रिलपासून पुढे तीन महिन्यांपर्यंत राज्यातील दुष्काळी भागांत या पाण्याचा वापर टँकरद्वारे करण्याची सूचना केली होती. त्याविषयीही काही हालचाली अद्याप सुरू झालेल्या नाहीत. यंदा राज्यात दृष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे पाण्यावाचून नागकिरांचे हाल होत आहेत. नवी मुंबईतही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. धरणापर्यंत टँकर पोहोचणे शक्य नसल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने २४ लाख रुपये खर्चून जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. दिघा परिसरातील नागरिकांचे सध्या पाण्यासाठी हाल सुरू आहेत. काही भागांत तर आठवडय़ातून दोन ते तीन दिवसच पाणी मिळत आहे. पालिकेची पाणीपुरवठा व्यवस्था अपुरी पडत असल्याने लोकप्रतिनिधी टँकरद्वारे पाणी देण्यासाठी कार्यरत आहेत. परंतु टँकरचेही वेळापत्रक नीट नसल्याने घरातील घागरी आणि पिंप पाण्यावाचून मोकळे आहेत. यासंदर्भात पालिकेचे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांनी जलवाहिनी टाकण्याचे काम येत्या आठवडय़ाभरात पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. नवी मुंबईकरांना पुरेसा पाऊस होईपर्यंत या धरणातून पाणीपुरवठा व्हावा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी आणि खासदार राजन विचारे यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता.