उच्च न्यायलयाने दिघ्यामधील ९४ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने येथील झोपडपट्टी विभागातील घरे विकत अथवा भाडय़ाने घेण्याकडे नागरिकांचा वाढता कल आहे. या पाश्र्वभूमीवर येथील झोपडय़ांचा भाव वधारला आहे, तसेच त्यांच्या भाडय़ातही वाढ झाली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिघ्यामधील शिवराम, पार्वती, केरु प्लाझा या निवासी इमारती जमिनदोस्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारतींमधील रहिवाशांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. या इमारतींमधील रहिवासी येथेच भाडय़ाने घर शोधत आहेत. ऐरोली, घणसोली, कळवा या ठिकाणी असणाऱ्या बेकायदा इमारतींमधील घरांच्या किमती या आवाक्याबाहेर असल्याने झोपडपट्टींमधील घर भाडय़ाने घेण्याकडे रहिवाशांचा कल आहे. झोपडपट्टीमधील गणपती पाडा, आनंदनगर, रामनगर, विष्णुनगर, संजय गांधीनगर, विटावा, दिघा झोपडपट्टीत १० बाय २० फुटांच्या घरांचे भाडे हे सुमारे ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत आहे.

तर, झोपडपट्टीमधील २००० पूर्वीच्या घरांना एसआरए योजना लागू होणार आहे. त्यामुळे २०००पूर्वीच्या घरांना मोठी मागणी आहे. सर्वेक्षण पावती असणाऱ्या घरांच्या किमतीमध्ये वाढ झाली त्याला किमान आठ ते दहा लाखांचा भाव मिळत आहे. पालिकेच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

झोपडपट्टीमध्ये दुमजली बांधकामे

उच्च न्यायालयाने अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने आता झोपडपट्टीमधील रहिवासी ‘आपली चाळच बरी’ असे बोलत आहेत. मागणी असल्याने या रहिवाशांनी घरे भाडय़ाने देण्यासाठी झोपडपट्टीतील घरांना दुसरा मजला चढविण्यास सुरुवात केली आहे.