प्रभागात उमेदवारांची वातावरणनिर्मिती करण्यापासून ते मतदार पावत्या पुरविणाऱ्या कंपन्यांची चलती

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> : कार्यकर्त्यांची मोठी फौज, वाहनांचा ताफा आणि ध्वनिक्षेपक हातात घेऊन मतांचा जोगवा मागत फिरण्याचे दिवस कधीचेच इतिहासजमा झाले आहेत. उमेदवारांनी तंत्रज्ञानाची कास धरून प्रचाराला आधुनिक ढंगही दिला आहे. मात्र, तंत्रज्ञानाच्या जोडीने होणाऱ्या लोकशाहीच्या स्पर्धेत आता उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या कंपन्यांनीही उडी घेतली आहे.

समाजमाध्यमांवरील  प्रचारापासून उमेदवाराच्या प्रतिमासंवर्धनापर्यंत आणि मुद्रित प्रचारसाहित्यापासून डिजिटल प्रचाराच्या साधनांपर्यंत साऱ्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी नवी मुंबई शहरात दिसू लागले आहेत.

या प्रचारतंत्राचा वापर निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, उमेदवारीसाठी पक्षांतर्गत दबाव वाढवण्याकरिताही केला जात आहे.  फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमांवर संबंधित उमेदवाराच्या कामांचा तपशील मांडणे, त्याचे प्रतिमासंवर्धन करणे, इतकेच नव्हे तर, उमेदवाराच्या नावाने ‘सुप्रभात’, सुविचारांचे संदेश व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रसारित करणे, अशा अनेक सेवा या कंपन्या पुरवत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या एकाच वेळी हजारो मतदारांना संदेश पाठविण्याची सोय कंपन्यांनी केली आहे. मतदारांच्या मागण्या, समस्या यांच्याबाबतही चित्रफिती तयार करून त्या मतदारांपर्यंत पोहोचविण्याची सोय करण्यात आली आहे.

निवडणुकीदरम्यान लागणारे जाहीरनामा, कार्यअहवाल असे मुद्रित प्रचारसाहित्य ‘रेडिमेड’ बनवून देणे, उमेदवारांच्या कामांच्या आकर्षक चित्रफिती बनवणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या उणिवांकडे बोट दाखवण्यासाठी छोटय़ा चित्रफितीही या कंपन्यांकडून तयार केल्या जातात.

अशा प्रकारची सेवा पुरवणाऱ्या अनेक ‘कन्स्टल्टन्सी’ संस्था सध्या नवी मुंबईतील इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेत असून या कामांसाठी ५० हजार रुपयांपासून सहा लाखांपर्यंतचे पॅकेज घेतले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या संस्थांसाठी काम करणारे कर्मचारी त्या त्या भागांत दोन महिन्यांसाठी घर किंवा कार्यालये भाडय़ाने घेऊन हा व्यवसाय करत आहेत.

टॅग ते मनुष्यबळ

* डिजीटल यंत्रणासोबत प्रभागातील समस्या आणि सोयीसुविधांची स्थिती दर्शविणारे पथनाटय़ बसवून  मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयोग केला जात आहे.

* उमेदवारांच्या प्रचारासाठी एलईडी स्क्रीन बसवलेल्या वाहनांचे बुकिंगही सध्या जोरात सुरू आहे. त्यावर उमेदवाराचे छायाचित्र, तीन ते चार नेत्यांना उभे राहण्यासाठी जागा, भाषण करण्यासाठीचे व्यासपीठ इत्यादी साहित्य पुरवल्या जात आहेत.

* प्रचारातील बोधवाक्याची ‘टॅग’ बनवून ती हजारो जणांना पाठवली जाते. तसेच प्रत्येक प्रभागाचा मोबाइल अ‍ॅप दिले जाणार आहे. कोणत्याही प्रभागातील मतदाराचे नाव टाइप करताच त्याची संपर्कासह माहिती मिळते. यासाठी विशिष्ट यंत्रेही उमेदवारांना पुरवली जातात.

* विविध पक्षांनीही डिजीटल सेल बनवला असून शहरातील विविध पक्षांच्या मोठय़ा नेत्यांनी अशा कंपन्यांना १११ प्रभागांचे सर्वेक्षण करण्याचे काम दिले आहे. कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवाराला पसंती आहे, याचा आढावाही या कंपन्यांच्या माध्यमातून घेतला जात आहे.