अपुऱ्या जागेत विभागाचा कोंडमारा; वातानुकूलन यंत्रणा वारंवार बंद

संतोष जाधव, नवी मुंबई</strong>

आपत्तीला सामोरे जाण्यासाठी व त्यावर नियंत्रणासाठी नवी मुंबई महापालिकेने २००६ पासून प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे. मात्र तो कक्षच पालिकेच्या देखण्या व टोलेजंग मुख्यालयात अडगळीत पडल्याचे चित्र आहे.

मुख्यालयात तळमजल्यावर हा कक्ष एका कोपऱ्यात असून सामान्य नागरिकाला तर सोडाच पण कर्मचाऱ्यांनाही तो शोधावा लागतो. या विभागात एक अधीक्षक, दोन लेखनिक, दोन शिपाई व पाच अग्निशमन विभागाचे कर्मचारी संपूर्ण शहरावर नियंत्रण करतात. पालिका इमारतीत हा एकमेव विभाग आहे की ज्या ठिकाणी २४ तास कर्मचारी उपलब्ध असतात. मात्र यासाठीची जागा अत्यंत अपुरी आहे. वातानुकूलन यंत्रणा तर असून नसल्यासारखी आहे. वारंवार ही यंत्रणा बंद असते. महापालिका इमारतीत किंवा बाहेर काही झाले तरी या कक्षात दूरध्वनी आल्याशिवाय काहीच कळणार नाही. कारण चारही बाजूला बंदिस्त भिंतीशिवाय बाहेरच काहीही दिसत नाही. साधी कपडे बदलण्याची खोलीही येथे नाही.

त्यामुळे शहराच्या आपत्ती स्थितीत आपत्ती नियंत्रणाची जबाबदारी ज्या आपत्ती कक्षातून होते तो कक्षच दुर्लक्षित झालेला आहे. या विभागाची पुरेशा जागेत व्यवस्था करण्याची मागणी वरिष्ठांकडे करूनही अद्यापि दखल घेतलेली नाही. दरवर्षीच्या बजेटमध्ये या विभागाबाबत तरतूद असते पण त्याची कार्यवाही कागदावरच राहत असल्याचे दिसून येत आहे.

२०१८मध्ये या विभागात आपत्तीशी संबंधित ३१२ तक्रारींची नोंद आहे. यावरून या कक्षाचे महत्त्व अधोरेखीत होते. तसेच आता पावसाळय़ाचे दिवस आले असून या कक्षाला दिवसरात्र काम करावे लागणार आहे. त्यामुळे या कक्षाची ही ‘आपत्ती’ दूर करणे गरजेचे आहे.