नवी मुंबई : करोनाच्या या ऐन संकटकाळात पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे यांना बाजूला सारून वैद्यकीय निर्णयाचे सर्व अधिकार आरोग्य विभागाशी सुतराम संबध नसलेले वादग्रस्त उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेतील आरोग्य विभागात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

पालिकेत सध्या दोन अतिरिक्त आयुक्त आहेत, पण त्या दोनपैकी नव्याने आलेल्या सुजाता ढोळे यांच्याकडे केवळ नावाला या विभागाचा पदभार देण्यात आला आहे. नवी मुंबई पालिकेत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५२ पेक्षा जास्त झाली आहे. यातील २२ जणांवर पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक हजार ४०० नागरिकांना आपल्या घरात वेगळे ठेवण्यात आले आहे.  करोना विषाणूचा संसर्गथोपविण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे पथक योग्य ते प्रयत्न करीत असताना ऐनवेळी पटनिगिरे यांचे समांतर वर्चस्व निर्माण केल्याबद्दल पालिकेत आश्र्चय व्यक्त केले जात आहे. पटनिगिरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच मुख्यालयातील दोन डॉक्टरांची बदली करून आपला वचक बसविला आहे.