बदल्या, आर्थिक व्यवहार, तक्रारी यामुळे ताणात  वाढ ; दोघांच्या आत्महत्येनंतर समुपदेशनाचे आदेश

पनवेल : पोलीस ठाण्यांचे प्रभारी पद वाटपातील कोट्यवधींचे कथित व्यवहार, दहा लाख रुपयांच्या लाचेचे प्रकरण आणि दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या यामुळे नवी मुंबई पोलीस दलात अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त बिपिनकुमार यांनी घेतला आहे. सर्व ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, दरम्यान साहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा पोलीस दलात आहे.

चार हजारांहून अधिक मनुष्यबळ असलेले नवी मुंबई पोलीसदल गेल्या वर्षभरापासून करोनामुळे सातत्याने ताणाखाली आहे. त्यातच पोलीस दलातील वरिष्ठ पदांवरील बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत असल्यामुळे अंतर्गत ताणही वाढला आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांनी पोलीस दलात सारे काही आलबेल नसल्याचे दाखवून दिल्याची चर्चा आहे. ऑगस्ट महिन्यात तक्रारदाराकडून दहा लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रोहित बंडगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तर गेल्या पंधरा दिवसांत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. या तिन्ही घटनांमुळे पोलीस दलात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

एपीएमसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले साहाय्यक निरीक्षक भूषण पवार यांनी १४ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र, एका प्रकरणात पवार यांच्याविरोधात झालेली तक्रार आणि आर्थिक वाटाघाटी याला कारणीभूत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आत्महत्येपूर्वी काही दिवस पवार हे आपल्या मित्रांकडून काही रक्कम उसनी मागत होते, अशी माहितीही समोर येत आहे. ही घटना ताजी असतानाच खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संतोष पाटील यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनांमुळे पोलीस दलातील काळी बाजू दबक्या आवाजात चर्चिली जात आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचेही काही पोलीस अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले. दरम्यान, पोलीस आयुक्त बिपिनकुमार यांनी आत्महत्यांमागे वैयक्तिक कारणे असल्याचे स्पष्ट केले. तसेच पोलीस दलात कोणतेही वाद नसल्याचेही ते म्हणाले.

आत्महत्या प्रश्नांचे  उत्तर असू शकत नाही!

‘पोलीस कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावताना घरगुती ताण विसरून मुक्त वातावरणात काम करण्याविषयीचे समुपदेशन स्थानिक पोलीस ठाण्यात प्रत्येक पोलीस निरीक्षक करतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आत्महत्या हे सर्व प्रश्नांचे उत्तर असू शकत नाही, असा संदेश पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना समुपदेशनात द्यावा, अशा सूचना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार यांनी दिल्या आहेत.