नवीन पनवेल वसाहतीतील शिवा कॉम्प्लेक्स ते आदई सर्कलपर्यंतच्या ७० वृक्षांना मिलीबग या रोगाची लागण होऊन हे वृक्ष सुकले आहेत. सिडकोला या वृक्षांची छाटणी करण्याची परवानगी वृक्ष प्राधिकरण समितीने दिली आहे. पावसाळ्यात मृतावस्थेमधील वृक्ष उन्मळून पडण्याचा धोका असल्याने ही झाडे तोडण्यात येणार आहेत. या वृक्षांच्या जागी या परिसरात सिडको कडुनिंब आणि सोनमोहरची लागवड करण्यात येणार आहे.

नवीन पनवेलच्या मध्यभागी मागील १० ते १५ वर्षांपूर्वीपासून सामान्यांना सावली देणारे गुलमोहरासारखे वृक्ष अचानक सुकू लागल्याने अनेक नागरिकांनी या वृक्षाच्या रोगाबाबत साशंकता व्यक्त केली होती. सिडकोच्या उद्याण विभागाच्या अधिकारी गीता सावंत यांनी याबाबत चौकशी केल्यावर मिलीबग नावाच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हे वृक्ष सुकल्याचे समोर आले. या सुकलेल्या वृक्षांमुळे पावसाळ्यात सामान्यांच्या अंगावर फांद्या कोसळू नये म्हणून सिडकोचे कार्यकारी अभियंता पी.व्ही. मूल यांनी वृक्ष प्राधिकरणाकडे वृक्ष काढण्याची परवानगी मागितली होती; परंतु पावसाळ्याआधी वृक्षांची छाटणी करावी, त्यानंतर हे मृत वृक्षतोडीचे काम हाती घ्यावे अशी सूचना प्राधिकरणाने केली आहे. नवीन पनवेलमध्ये यापूर्वी सिडकोने कडुनिंबांची ५० रोपटी लावली होती. मात्र रहिवाशांनी कडुनिंबाच्या रोपटय़ांची पाने काढण्याचा सपाटा लावून ही रोपटी वाढण्यापूर्वीच तिचे अस्तित्व नाहीसे केले. त्यामुळे नवीन पनवेलमध्ये कडुनिंब वृक्ष वाढले नाहीत. कडुनिंबाच्या वृक्षामुळे ऑक्सिजनचे प्रमाण परिसरात वाढते तसेच डासांवर काही अंशी आळा बसतो. त्यामुळे पुन्हा एकदा सिडकोच्या वतीने नवीन पनवेलमध्ये कडुनिंब वृक्षांची रोपटे लावण्याचा प्रयत्न होणार आहे.