चौगुले-नाहटा गटांतील वाद उद्धव ठाकरेंपर्यंत; पक्षप्रमुखांकडून सामोपचाराचा सल्ला

नवी मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांत यादवी सुरू झाली आहे. जुने विरुद्ध नवे नगरसेवक, अशी दुफळी निर्माण झाली आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा अनुल्लेख, राष्ट्रवादीशी घरोबा, टक्केवारीतील हिश्शाची पळवापळवी, नेत्यांकडून सापत्न वागणूक यामुळे नवी मुंबई शिवसेनेतील वाद सोमवारी मातोश्रीपर्यंत पोहोचला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रमुख नेत्यांची समजूत काढून एकत्र राहण्याचा सल्ला दिला. आपली खरी लढत आता भाजपविरोधात असल्याचे त्यांनी सर्व नगरसेवकांना सांगितले.

मागील आठवडय़ात झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांनी अर्थसंकल्प सादर करताना विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा नामोल्लेख टाळला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांवर स्तुतिसुमने उधळली. त्यामुळे संतापलेल्या चौगुले यांनी आपले सर्मथक असलेल्या काही जुन्या नगरसेवकांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर झाला प्रकार घातला. त्यामुळे शिंदे यांच्या पुढाकाराने सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सेनेच्या नवी मुंबईतील सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. सकाळी ११ वाजता होणारी ही बैठक उशिरा सुरू झाली व तीन वाजता संपली.

ठाकरे यांनी पालकमंत्री, खासदार राजन विचारे, चौगुले, उपनेते विजय नाहटा, आणि शिवराम पाटील यांच्याबरोबर बंद खोलीत एक तास चर्चा केली. नवी मुंबई महापालिकेत सुरू असलेली सुंदोपसुंदी, एकाधिकारशाही, मनमानी, टक्केवारी, मानपान याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. बंद दरवाज्यात झालेल्या या चर्चेबद्दल नंतर बाहेर चर्चा करण्यात आली नाही, पण सर्वानी एकत्र काम करा आणि राज्यात आता खरा शत्रू भाजप आहे, हे ठाकरे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.

नवी मुंबई पालिकेतील नगरसेवकांमध्ये सुरू झालेल्या अंर्तगत वादाला अनेक कांगोरे आहेत. त्यातील प्रमुख मुद्दा टक्केवारीचा आहे. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना तिजोरीच्या चाव्या शिवसेनेच्या हातात आहेत. असे असताना निदान स्थायी समितीतील सदस्यांचे चांगभले होईल अशी अपेक्षा फोल ठरली आहे. स्थायी समितीत मंजूर होणाऱ्या कामांच्या टक्केवारीचे केवळ

चार भाग पडतात. ते ऐरोली व बेलापूर या भागांत विभागाले जात आहेत. त्यामुळे नगरसेवकांत संताप व्यक्त केला जात असून पक्षात जुने व नवीन नगरसेवक असे दोन गट पडले आहेत.

या वादाला सेनेचा एक उपरा नेता खतपाणी घालत असून नगरसेवकांमधील संवाद नाहीसा झाला आहे. त्यामुळे पक्ष फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईतील या यादवीवर नजर ठेवण्याची सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे यांनी दिल्या आहेत.

टक्केवारीच्या वाटपावरून वाद

पालिकेच्या शिक्षण मंडळीतील एका निविदेच्या बदल्यात मिळालेल्या टक्केवारीचे समान वाटप न झाल्याने या यादवीला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. लाखो रुपयांत असलेली ही रक्कम एका न्यायालयीन प्रक्रियेवर खर्च करण्यात आली, असा खुलासा केला जात आहे, पण ते सेना नगरसेवकांना मान्य नाही. त्यात वाशीतील एका नगरसेवकाला विधानपरिषदेच्या काळात देण्यात आलेले दीड लाख रुपये देखील परत मागण्यात आल्याने ग्रामीण नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. सेनेचा खरा शत्रू भाजप असल्याचे पक्षप्रमुख सांगत असताना नवी मुंबईतील भाजपाचे नगरसेवक दीपक पवार सेनेच्या या गटात होते. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.