विमानतळ नामकरणाबाबतच्या विनोदी ट्वीटवर गमतीशीर प्रतिक्रिया; प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांकडून पुरी यांच्यावर टीका

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले असतानाच केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ट्विटरवरून केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त होत आहे. अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून केलेले एक विनोदी ट्वीट शेअर करत पुरी यांनी त्यावर गमतीशीर भाष्य केले. मात्र, याबद्दल प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी पुरी यांच्यावर टीका करत त्यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.

अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी २०१९मध्ये नवी मुंबई विमानतळाबाबत एक ट्वीट केले होते. संता आणि बंता या विनोदीपात्रांचा आधार घेऊन मुंबईतील ‘सांता’क्रूझ विमानतळाच्या धर्तीवर नवी मुंबईतील विमानतळाला ‘बंता’क्रूझ हे नाव देण्याची मागणी बंता करत असल्याचे त्या ट्वीटमध्ये म्हटले होते.

हे दोन वर्षांपूर्वीचे ट्वीट नागरी उड्डानमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर केले.  तसेच ‘नागरी उड्डाण मंत्रालयाकडे नेहमीच विमानतळांच्या नामकरणाचे, नामांतराचे प्रस्ताव येत असतात. मात्र, बंताच्या मागणीचा प्रस्ताव आमच्याकडे अद्याप आलेला नाही’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर ट्विटरवरून हास्याची कारंजी फुलली असली तरी, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त वर्गातून मात्र नाराजीचा सूर उमटत आहे.

काँग्रेसचे स्थानिक नेते

आर. सी. घरत यांनी पुरी यांच्या माफिनाम्यासाठी भाजपचे नेते आंदोलन करतील का, असा सवाल केला. ‘दि. बा. पाटील यांच्याविषयी सदैव प्रेम महाविकास आघाडीच्या व कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे व राहील मात्र जनसामान्यांच्या मनात स्थानिक भाजपचे नेते घृणा निर्माण करून आंदोलन उभे करू पाहात आहेत. भाजपचे राज्यातील नेते म्हणतात की भाजपचा या आंदोलनात काही संबंध नाही. त्यामुळे कोणाचा कोणाशी ताळमेळ नाही हे केंद्रीयमंत्र्यांच्या टिंगलटवाळीच्या ट्वीटमधून दिसते,’ असे ते म्हणाले. शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनीही केंद्रीय मंत्र्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.

‘नामकरणासाठी स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते आंदोलनाचा धुरळा उठवीत आहेत. राज्यातील भाजपचे नेते प्रवीण दरेकर हेही भाजपची भूमिका नसल्याचे सांगतात. आणि त्याच पक्षाचे असलेले केंद्रीय मंत्री दि. बा. पाटील व बाळासाहेब ठाकरे यांची टिंगलटवाळी करत आहेत,’ असे ते म्हणाले.