10 April 2020

News Flash

तलावे परिसर पाणथळ नाही!

एनआरआय संकुलामागील पाणथळ जागेवर सिडकोच्या वतीने विकास केला जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सर्वेक्षणातील दाव्यामुळे गोल्फ कोर्सचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे

नवी मुंबई : सीवूड्स येथील एनआरआय संकुलामागील जागा ही पाणथळ जागा नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या तहसील कार्यालयाने नवी मुंबईत केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. वने आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी निरीक्षण अहवाल मागवला असतानाही त्याबाबत कार्यवाही सुरू न करता तलावे पाणथळ (वेटलँड) जागेला पानथळ जागेच्या यादीतून काढून टाकण्यात आल्याने गोल्फ कोर्स आणि निवासी संकुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबईत सुरुवातीला १९ पाणथळ जागांची नोंद झाली होती, मात्र जिल्हा प्रशासनाच्या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या यादीत फक्त तीनच पानथळ जागा दाखविण्यात आल्या आहेत.

एनआरआय संकुलामागील पाणथळ जागेवर सिडकोच्या वतीने विकास केला जाणार आहे. त्या कामाला नुकतीच सुरुवात झाली होती. या कामाला सीवूड्समधील पर्यावरणवादी कायकर्ते आणि सजग नागरिकांनी विरोध दर्शविला होता. याप्रकरणी कार्यकर्त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सिडकोचे व्यवस्थापैकीय संचालक लोकेश चंद्र आणि नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर हे उपस्थित होते. याच बैठकीत पर्यावरणमंत्र्यांनी अहवाल मागवला होता.

येथील पाणथळ जमिनीवर बहुमजली निवासी संकुल आणि गोल्फ मैदानाच्या निर्मितीबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही सिडकोच्या परवानगीने ‘मिस्त्री कन्स्ट्रक्शन’च्या माध्यमातून जागेवरील ७२४ वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. यासंदर्भात पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी वारंवार आवाज उठवला होता. तरीही सिडको प्रशासनाने त्याला न जुमानता जमीन सपाटीकरणाचे काम सुरू केले होते.

यावर येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सीवूड्समधील पाणथळ जागा नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय इतर १६ पाणथळ जागांना पाय फुटले का, असा सवाल पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याच वेळी जिल्हा प्रशासनाच्या सर्वेक्षणामुळे येथील सीवूड्समधील गोल्फ कोर्सचा मार्ग मोकळा गोल्फ कोर्स आणि गृहसंकुलाच्या उभारणीच्या सिडकोच्या इराद्याला बळ मिळाल्याचा आरोपही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केला आहे.

सीवूड्स सेक्टर-६० मधील एनआरआय संकुलाच्या मागील बाजूस असलेल्या ए, बी, सी, डी आणि ई ब्लॉकमधील ३३.५५ हेक्टर जागेवर गोल्फ कोर्स आणि बहुमजली निवासी संकुल उभारण्याची परवानगी सिडकोने दिली आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१७ मध्ये ही जागा पानथळ यादीत असल्याने येथील काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. यावर सिडकोने स्वत:च्या अधिकारातील २.२ हेक्टर जागेवरील ७२४ वृक्षांची कत्तल केल्याने ऐरोली येथील फ्लेमिंगो अभयारण्याच्या धर्तीवर सीवूड्स येथेही अभयारण्य उभारण्याबाबतचे येथील नागरिकांचे स्वप्न भंग पावल्याची प्रतिक्रिया पर्यावरणवादी कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. या संदर्भात सिडकोचे व्यवस्थापैकीय संचालक लोकेश चंद्र यांना संपर्क केला असता तो झाला नाही.

८०० ई-मेल

प्रस्तावित गोल्फ कोर्सची जागा पाणथळ क्षेत्राची आहे. ही बाब उच्च न्यायालयाने २०१७ रोजी मान्य केली आहे. याच वेळी ही जागा पानथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत ८०० ई-मेल मुख्यमंत्री, सिडकोचे व्यवस्थापैकीय संचालक, पर्यावरणमंत्र्यांना पाठविण्यात आले आहेत. याबाबत कोणाकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही.

बैठकीत निर्णय काय?

वने आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सीवूड्स येथील एनआरआय संकुलामागील पाणथळ जागेत फ्लेमिंगो अभयारण्य उभारण्याबाबत निर्देश दिले होते. याच वेळी ही जागा संरक्षित करण्याच्या उद्देशाने आठ दिवसांत गोल्फ कोर्सबाबतचा प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याकडे सिडकोने दुर्लक्ष करत भूखंडावर सपाटीकरणाचे काम सुरू केले होते.

सीवूड्स येथील २.२ हेक्टर जागेवरच वृक्ष आणि जमीन आहे. उर्वरित इतर सर्व जागा पानथळ आहे. तरीही जिल्हा प्रशासन गोल्फ कोर्सची जागा पानथळाची नसल्याचे यादीवरून सांगत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन तहसील कार्यालयाचा अहवाल संशयास्पद आहे.– सुनील अग्रवाल, पर्यावरणवादी कार्यकर्ते

जिल्हा प्रशासनाच्या तहसील कार्यालयाने पाणथळ क्षेत्राचे सर्वेक्षण करून यादी जाहीर केली आहे. परंतु याबाबत तज्ज्ञ समितीकडून यादीची छाननी सुरू केली जाईल.– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 12:13 am

Web Title: district administration survey signs of the golf course being paved akp 94
Next Stories
1 विमान उड्डाणातील टेकडीचा दुसरा अडथळा हटविणार
2 उपजिल्हा रुग्णालयात शवपेटय़ा कार्यान्वित
3 नवी मुंबईतील बारमालकाची कर्नाटकच्या जंगलात हत्या, चौघांना अटक
Just Now!
X