जिल्हा उपनिबंधकांचे आदेश; नव्याने राहण्यास येणाऱ्यांना पोलीस, डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक

नवी मुंबई</strong> : टाळेबंदीअगोदर नवीन सदनिका खरेदी केलेले ग्राहक तसेच भाडेकरार केलेल्या भाडोत्रींना गृहनिर्माण संस्थेतील प्रवेश नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे जिल्हा उपनिबंधकांनी दूरसंवादाद्वारे घेतलेल्या बैठकीत दिला आहे. सोसायटीत नव्याने राहण्यास येणाऱ्या रहिवाशाने स्थानिक पोलीस ठाण्याचे व शासकीय डॉक्टरांचे प्रमाणपत्र सोसायटीत जमा करणे आवश्यक असल्याचेही उपनिबंधकांनी स्पष्ट केले आहे.

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने अनेक सोसायटय़ांनी संर्सग टाळण्यासाठी काही नियम तयार केले आहेत. यात रहिवाशांच्या सोसायटीतील येण्या-जाण्यावर निर्बंध घालण्यात आले असून जीवनवाश्यक वस्तूंची खरेदी ही प्रवेशद्वारापर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील गृहनिर्माण संस्थांसाठी ठाणे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने एक वेबनार बैठक आयोजित केली होती. जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील यांनी या बैठकीत भाग घेतलेल्या पदाधिकाऱ्यांना विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. करोना संकटकाळात आता गृहनिर्माण संस्थांनी आपल्या कामकाजात काही बदल करून येणाऱ्या काळात काम करावे अशा सूचना उपनिबंधकांनी दिल्या आहेत.

अनेक गृहनिर्माण संस्था मोठय़ा प्रमाणात ज्येष्ठ नागरिक असून त्यांना घरगुती कामकाज करणाऱ्या घरेलू कामगारांशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार हे घरेलू कामगार सोसायटीत प्रवेश करीत असतील तर त्यांना मज्जाव करता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.  काही सोसायटीतील अनागोंदी कारभाराच्या तक्रारीमुळे निबंधक कार्यालयाने जुने संचालक मंडळ बरखास्त करून सोसायटीवर प्रशासक नेमले असून ते प्रवासबंदीमुळे सोसायटीत येऊ शकत नाहीत. अशा वेळी सोसायटीतील साठ टक्के सदस्यांच्या सह्य़ा घेऊन नवीन तीन सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. यात सोसायटीबद्दल तक्रार केलेले रहिवासी अथवा जुने पदाधिकारी या तीन सदस्य समितीत नसावते असे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व सोसायटींचे ऑडिट आणि सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याविषयी २५ मेपर्यंत निर्णय जाहीर केला जाईल असे उपनिबंधकांनी स्पष्ट केले आहे. वेळेवर सोसायटी शुल्क न भरणाऱ्या रहिवाशांना दंड अथवा व्याज घेण्याविषयीचा निर्णय हा सर्वस्वी सोसायटीचे संचालक मंडळ किंवा सर्वसाधारण सभेत घेण्यात यावा, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.  या बैठकीत माजी आमदार संजय केळकर, ठाणे हाउसिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष राम भोसले व ९० सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते.

सोसायटयांकडून दीड कोटी मदत

* सोसायटींनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला आर्थिक मदत करण्याविषयी आवाहन करण्यात आले असून आतापर्यंत जिल्ह्य़ातील सोसायटीकडून दीड कोटी रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्यात आले आहेत.

* सोसायटीतील रहिवाशांच्या घरात काम करणाऱ्या घरेलू कामगारांची माहिती राज्य शासनाला देण्यात यावी. या कामगारांना येत्या काळात केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनचा फायदा या माहितीमुळे मिळू शकणार असल्याचे उपनिबंधकांनी सांगितले.