|| विकास महाडिक

समुपदेशन करणाऱ्या सामाजिक संस्थांची कमतरता; पोलिसांच्या पुढाकारामुळे दोनशे दाम्पत्यांचे पुन्हा मनोमीलन

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे होणारी चिडचिड, चकचकीत आयुष्य जगण्यासाठी केलेल्या आर्थिक तडजोडींमुळे येणारा ताण आणि एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नसल्याने निर्माण झालेला अबोला या आणि अशा अन्य कारणांमुळे पतीपत्नीतील वादाच्या तब्बल ६०० तक्रारी नवी मुंबईत वर्षभरात दाखल झाल्या आहेत.

विशेष म्हणजे, पती-पत्नीतील विसंवाद दूर करून त्यांचे पुन्हा मनोमीलन घडवणाऱ्या सामाजिक समूपदेशन संस्थांची संख्या शहरात नगण्य आहे. त्यामुळे एकदा तुटलेला  विवाहबंधनाचा धागा पुन्हा जोडणे अनेकदा शक्य होत नाही. त्यातल्या त्यात पोलीस आपल्या पातळीवर दाम्पत्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहेत.  नवी मुंबई पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षाने यापैकी २०० दाम्पत्यांचे समुपदेशन करून मोडणारे संसार पुन्हा एकदा सावरण्यात यश मिळविले आहे.

आधुनिक महानगरीय संस्कृतीचे प्रतीक असणारी नवी मुंबई नोकरदार आणि व्यावसायिकांचे शहर आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत पती-पत्नी आणि त्यांची एक अथवा दोन मुले बहुतेक ठिकाणी आढळतात. धावपळीच्या जीवनात एकमेकांसाठी कमी वेळ मिळणे, समाज माध्यमावरील अभासी जगाचे आकर्षण, वाढत्या अपेक्षा, त्यातून येणारे अपेक्षाभंगाचे दु:ख आदी कारणांमुळे कौटुंबिक कलहांचे प्रमाण वाढले आहे. नवी मुंबई आयुक्तालयाच्या महिला साहाय्य कक्षात दर दिवसाला १५ ते २० प्रकरणे येतात.

गेल्या वर्षभरात अशी ६०० प्रकरणे दाखल झाली आहेत. महिला साहाय्य कक्षात तक्रारी दाखल केल्यानंतर संबंधित दाम्पत्यांचे समुपदेशन करून भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. तडजोडीने प्रकरण मिटू शकले नाही, तरच ते प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जाते. दोन ते तीन तास पती आणि पत्नी दोघांचीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रयत्नांना चांगले यश मिळत असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबईतील २०० कुटुंबे गेल्या वर्षभरात त्यातून सावरली आहेत. त्यामुळे या दाम्पत्यांना न्यायालयीन किंवा पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ आली नाही. पर्यायी कुटुंबांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास वाचला आहे. ठाणे आणि पुण्यासारख्या मोठय़ा शहरांतही इतक्या मोठय़ा प्रमाणात अशा तक्रारी दाखल होत नाहीत, असा दावा पोलिसांनी केला आहे.

पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणातून कौटुंबिक वाद विकोपाला गेले आहेत.  नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या वादातूनही कौटुंबिक कलह चव्हाटय़ावर येत आहेत. याची दखल घेऊन तक्रार निवारण विभाग अद्ययावत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

महामुंबई क्षेत्रात कौटुंबिक वादाच्या तक्रारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याला एक सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कौटुंबिक समस्या सोडविणाऱ्या काही संस्था कार्यरत आहेत. पण नवी मुंबईत या सामाजिक जाणिवेचा अभाव असल्याने पोलिसांकडे तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. वर्षांला ५०० ते ६०० कौटुंबिक तक्रारी येत असून त्यातील २०० प्रकरणांत समझोता करण्यात आम्हाला यश आले आहे.    – मीरा बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महिला साहाय्य कक्ष