दिवाळीनिमित्त सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो, मात्र नोटबंदी व जीएसटीमुळे सोने खरेदीला आतापर्यंत हवातसा प्रतिसाद ग्राहकांकडून मिळत नसला तरी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला उभारी येईल, अशी आशा सराफांकडून व्यक्त केली जात आहे.

दिवाळीत विशेषत: धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन आणि पाडवा या दिवशी सोने खरेदी केले जाते. मात्र यंदा जीएसटीमुळे सोने आणि चांदी खरेदीवर परिणाम होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण ही शक्यता फोल ठरत असल्याचे चित्र बाजारात असून ३% जीएसटी असूनही त्याचा फारसा परिणाम सोने खरेदीवर झाला नसल्याचे माहिती सराफांकडून दिली जात आहे. जीएसटीमुळे साधारण १० ते २० टक्के ग्राहक कमी झाल्याची माहिती सोने व्यापारी देत आहेत. शिवाय भावात फारसा चढ-उतारदेखील झालेला नसल्याने चांदी प्रतिकिलो ३९ हजार ७६७ तर सोने २९ हजार ५६८ प्रतितोळा विकले जात आहे.

पारंपरिक दागिन्यांना पसंती

दागिन्यांची परंपरा आपल्याकडे पूर्वापार आहे. यंदाच्या दिवाळी सणात ग्राहकांनी पारंपरिक दागिन्यांना अधिक पसंती देत असल्याची माहिती वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी दिली आहे. या दागिन्यांमध्ये विशेषत: चिंचपेटय़ा, वजरटिक, ठुशी, मोहनमाळ, पुतळीहार, सर, कोल्हापुरी सजा, जोंधळी हार, लफ्फा, तन्मणी, दुलेदिया, शिरोण, चंद्रहार, तोडे, बकुळी हार, कुंदनाचे हार आशा सुवर्णाना अधिक मागणी आहे.