दिवाळी आणि खरेदी हे एक समीकरणच असून यावेळी मोठय़ा प्रमाणात विविध वस्तूंची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. यामध्ये कपडे, दागिने, नवीन घर, वाहन तसेच अनेक चैनीच्या वस्तूंचीही खरेदी केली जाते. तर याच दिवसात फटाके फोडून दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. एकीकडे आनंदात आणि उत्साहात अशा प्रकारची दिवाळी साजरी केली जात असताना पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो किलोमीटरवरील वर्धा व नागपूर जिल्ह्य़ातून आलेल्या चार जणांच्या कुटुंबात केवळ पन्नास रुपयांच्या फटाक्यात एक आगळीवेगळी दिवाळी साजरी होत आहे. उरण-चिरनेर रस्त्यालगत मोठी जुई गावाजवळ या कुटुबांची वस्ती आहे. एकीकडे खाद्याची रेलचेल असताना ऐन दिवाळीत त्यांना उपासही घडत आहे.

या कुटुंबात राम किसनाजी शिंदे हा २९ वर्षीय तरुण त्याच्या दोन मुलांसह राहत आहे. विदर्भातील त्याच्या मालकाने खाटेच्या लोखंडी चौकटी बनवून दिलेल्या आहेत. तसेच खाटेला विणण्यासाठी नायलॉनची पट्टीही दिली आहे. या खाटा मोटार सायकलवर लटकवून दररोज शंभर ते दीडशे किलोमीटरचा प्रवास करीत त्यांची विक्री करायची हा त्यांचा उद्योग आहे. भटक्या विमुक्त जातीतील असल्याने गावी ना जमीन ना मालकी हक्काचे काही साधन, अशी स्थिती. दिवाळीत मुलांची हौस म्हणून फटाके हवेत, मात्र हे फटाके एवढे महाग की विचारायची सोय नाही. त्यामुळे मी केवळ ५० रुपयांचे फटाके घेतले त्यात एक अ‍ॅटम बॉम्बचा बॉक्स, एक चक्र, तर दहा सुळसुळी एवढे आले, आता यात आमची दिवाळी साजरी होणार, असे तो म्हणाला.