27 May 2020

News Flash

कोल्हापुरी आकाशकंदील बाजारात

 बाजारात विविध प्रकारचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

 

|| पूनम धनावडे

चिनी साहित्य हद्दपार; भारतीय बनावटीचे साहित्य तेजीत :– प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीचा सणाचे अवघ्या काही दिवसांनी आगमन होणार आहे. त्यानिमित्त बाजारात आकाशकंदील, रांगोळ्या, लक्ष्मीदेवीच्या मूर्ती, पणत्या खरेदीसाठी गर्दी होऊ  लागली आहे. यंदा चिनी साहित्य बाजारपेठेतून हद्दपार झाले असून भारतीय बनावटीचे कोल्हापुरी साज असलेले आकाशकंदील मोठय़ा प्रमाणात बाजारात पाहायला मिळत आहेत.

बाजारात विविध प्रकारचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. प्लास्टिकबंदी तसेच चिनी साहित्यावर बहिष्कार टाकल्याने बाजारात भारतीय बनावटीच्या साहित्याला मोठी मागणी सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून चायना आकाशकंदील अधिक प्रमाणात विक्रीसाठी येत होते. यंदा त्याचे प्रमाण तुरळक आहे. देशी बनावटीच्या आकाशकंदिलांना यंदा चांगली मागणी आहे. कापडी,  स्पंच,  कागद, आईस्क्रीमच्या काडय़ा, बांबूंपासून तयार केलेले आकर्षक पर्यावरणपूरक आकाशकंदील बाजारात उपलब्ध आहेत.   रंगीबेरंगी, मण्यांची सजावट केलेल्या विविध प्रकारच्या आकर्षक पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.  १० रुपयांपासून ते ६० रुपये डझनाचा भाव आहे. तर मोठय़ा विविधरंगी, सजावटीच्या पणत्या २०  ते १०० रुपयांवर उपलब्ध आहेत. यंदा साहित्याच्या किमती १० टक्के  वाढल्या असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच दिवाळीच्या शुभेच्छा देणारे पुठय़ाचे पोस्टरदेखील उपलब्ध आहेत. रांगोळीमध्ये स्टिकर्सच्या रांगोळीला अधिक मागणी असते. लक्ष्मीपूजनला घराच्या चौकटीवर शुभ लाभ, देवीची पावले चिटकविली जातात. त्यामध्ये पुठय़ापासून बनविलेले स्टिकर्स उपलब्ध आहेत. हे स्टिकर्स २०-८० रुपये तर शुभेच्छा पोस्टर १८०-२५० रुपयांवर उपलब्ध आहेत.

९० पासून १४०० रुपयांपर्यंत कंदील

गणेशोत्सवात कोल्हापुरी विणकाम, नक्षीकाम केलेले मखर दाखल झाले होते, त्याचप्रमाणे आता कापडी कंदीलही उपलब्ध आहेत. कापडावर नक्षीकाम, विणकाम करून हे कंदील बनविण्यात आले आहेत. हे कंदील कोल्हापूरहून मोठय़ा प्रमाणावर दाखल झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. कापडी विणकाम केलेले आकारानुसार कंदील ९० ते १४०० रुपयांवर उपलब्ध आहेत. तर कागदापासून बनविलेले कंदील १५०-६०० रुपयांवर आणि स्पंचपासून बनविलेले कंदील ४००-५०० रुपयांवर उपलब्ध आहेत.  गुजरात येथून स्पंजपासून बनविलेले झुंबर-कंदीलही ग्राहकांना आकर्षित करीत असून ५००-६०० रुपयांवर तर आईस्क्रीमच्या काडय़ापासून तयार केलेले कंदील ८००-९०० रुपयांवर मिळत आहेत.

सुगंधी मेणाच्या पणत्यांना पसंती भेटवस्तूंमध्ये मेणाच्या सुगंधी पणत्यांना अधिक पसंती मिळत आहे. यामध्ये विजेवर चालणाऱ्या पणत्या उपलब्ध आहेत. वॅक्स कँडल फ्रॅग्रन्स जार या पणत्या  ६०० रुपयांना १२ नग तर एक नग ६० रुपयांने त्याची विक्री होत आहे.

यंदा बाजारात चायना बनावटीचे साहित्य हद्दपार झाले आहे तर प्लास्टिकबंदीने कापडी, कागदी, स्पंचपासून बनविलेले कोल्हापुरी साज असलेले आकाशकंदील दाखल झाले आहेत. तसेच भेटवस्तू देण्यासाठी मेणाच्या सुगंधी पणत्यांनादेखील अधिक मागणी आहे. -भवन सिंग, विक्रेता, वाशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 1:14 am

Web Title: diwali festival akash kandil made in india akp 94
Next Stories
1 नवी मुंबईतील सागरी किनारा मार्गाविरोधात याचिका
2 खारघरला ‘मोरबे’चे पाणी
3 माथाडी कामगारांत खदखद
Just Now!
X