23 November 2020

News Flash

Coronavirus : महिनाभरात रुग्णदुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर 

उपचाराधीन रुग्णसंख्याही घटली

उपचाराधीन रुग्णसंख्याही घटली

नवी मुंबई : दिवसाला चारशेच्या घरात असलेली करोनाबाधितांची संख्या नवी मुंबईत आठवडाभरात शंभर ते दोनशेच्या घरात आली आहे. महिनाभरात रुग्ण दुपटीचा काळ ८० दिवसांवरून सहा महिन्यांपेक्षा अधिक म्हणजे १८६ दिवसांवर गेला आहे.

नवी मुंबईत करोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र आहे. ऑगस्टमध्ये ४५ दिवसांवर असलेला रुग्णदुपटीचा काळ आता १८६ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबई, ठाणे, पनवेल शहरांपेक्षा हा कालावधी जास्त आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांतही घट होत आठ दिवसांपासून संख्या सातत्याने कमी होत आहे. ही नवी मुंबईकरांना दिलासा देणारी बाब आहे.

करोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी नागरिकांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. मार्च महिन्यात नवी मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत आता शहरातील करोनाबाधितांची संख्या ही ४४ हजारांपर्यंत पोहचली असून ८८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

टाळेबंदी शिथीलीकरणानंतर शहरातील सर्वच व्यवहार सुरू झाल्यानंतर तसेच गणपती उत्सव काळात शहरातील करोनाबाधितांची संख्या ही मोठय़ा प्रमाणात वाढत होती. मागील महिन्यात तर दररोज सरासरी ३०० ते ३५० नवे रुग्ण सापडत होते. त्यामुळे पालिकेने आरोग्य सुविधांत दुपटीने वाढ केली आहे. करोना उपचारांसाठी मागील तीन महिन्यांत खाटांची संख्या दुप्पट झाली असून चाचण्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढवलेली आहे. परिणामी करोनाबाधितांची संख्या आता नियंत्रणात येत आहे. गेल्या आठवडाभरापासून यात दररोज घट होत आहे. आठ दिवसांपूर्वी दिवसाला २०९ असलेली करोनाबाधितांची संख्या ही आता १२२ पर्यंत खाली आली आहे.

विशेष म्हणजे यात सातत्याने घट होत आहे. शासनाच्या आदेशानुसार पालिकेने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली असून यामुळे शहरातील नागरिकांची आरोग्यस्थिती पालिकेला मिळत आहे. त्यादृष्टीने आरोग्याबाबतचे नियोजन सुरू आहे.

आठवडाभरातील रुग्णस्थिती 

* २० ऑक्टोंबर :       २०९

* २१ ऑक्टोंबर  :     २५३

* २२ ऑक्टोंबर  :      २०२

* २३ ऑक्टोंबर :       १९६

* २४ ऑक्टोंबर  :      १६८

* २५ ऑक्टोंबर  :      १८१

* २६ ऑक्टोंबर  :      १२२

नवी मुंबई शहरात करोनाबाधितांच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असून ही संख्या ३५० वरुन २००च्या आत आली आहे. शहरात रुग्णदुपटीचा दर हा १८६ दिवस म्हणजे ६ महिन्यांपेक्षा अधिक झाला आहे. शहराला हा मोठा दिलासा आहे. परंतु नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.

 – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 1:53 am

Web Title: doubling rate of covid 19 cases has increased to 186 days in navi mumbai
टॅग Coronavirus
Next Stories
1 कांदा दर साठ रुपयांवर
2 दोन हजारांपेक्षा अधिक दस्त नोंदणी?
3 ‘एपीएमसी’तील धान्यविक्रीवर परिणाम
Just Now!
X