भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या निमित्त उरण तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. जेएनपीटी कामगार वसाहतीत आंबेडकरांचा जीवनपट उलगडणारे रांगोळी प्रदर्शन भरविले होते. शहरातील आंबेडकर उद्यानातही विविध कार्यक्रम झाले. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शहरातून मिरवणुकाही काढण्यात आली. आंबेडकर यांचे विचार अनुयायांपर्यंत पोहोचविण्यासाठी आंबेडकरी चळवळ तसेच त्यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले.
उरण नगरपालिकेच्या बालोद्यानातील पुतळ्याजवळ कार्यक्रम झाले. या वेळी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, बौद्धजन पंचायत संघटनांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनेकांनी मानवंदना दिली, तर शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
जेएनपीटी बंदरातील कामगारांच्या वतीने जेएनपीटी कामगार वसाहतीत जयंती महोत्सवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आलेले होते. यात बाबासाहेबांनी समतेसाठी केलेली आंदोलने याचीही रांगोळी काढण्यात आलेली होती. तसेच बाबासाहेबांचे विचार देणारी त्यांनी लिहिलेली व त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांची विक्री व प्रदर्शनही भरविण्यात आलेले होते.