कंत्राटदाराने काम थांबवले; निविदा पुन्हा काढण्याचा निर्णय

कंत्राटदार काम करत नसल्यामुळे ऐरोली नाटय़गृह रखडल्याची चर्चा सुरू असतानाच नाटय़गृहाच्या कामाची निविदा पुन्हा काढण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता शंकर पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नाटय़गृहासाठी नागरिकांना आणखी किमान दोन वर्षे तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ऐरोली मतदारसंघातील रहिवाशांना नाटक पाहण्यासाठी मुलुंड किंवा ठाणे गाठावे लागते. त्यामुळे पैसे व वेळ वाया जातो. रसिकांना सहजपणे नाटक पाहता यावे आणि परिसरातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी या नाटय़गृहाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळात या नाटय़गृहाचे भूमिपूजन करण्यात आले. नाटय़गृहात पार्किंग आणि उपाहारगृहाचीही सोय करण्यात येणार होती. पायाभरणी

साठी खड्डा खोदण्यात आला त्यात बिमही बांधण्यात आले, मात्र पुढे काहीच झाले नाही. पावसाचे पाणी त्या खड्डय़ात साचून तळे तयार झाले आहे. त्याच्या दरुगधीचा आणि त्यामुळे डासांच्या होणाऱ्या उत्पत्तीचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. या परिसरात लहान मुले खेळण्यासाठी गेल्यास पाणी साचलेल्या खड्डय़ात पडून अपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

मध्यंतरी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या नाटय़गृहाच्या जागेची पाहणी केली. नाटय़गृहाला प्रतिसाद मिळेल का, ते चालले का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यामुळे हे नाटय़गृह येथे होणार की नाही, असा प्रश्न ऐरोलीतील रहिवाशांना पडला आहे.

नाटय़गृहाचे स्वरूप

४८ कोटी २५ लाख रुपये खर्च करून नाटय़गृहाची चार मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यात ८६० प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था असेल. शिवाय रंगीत तालीम करण्यासाठी कक्ष, अतिथीगृह, प्रतीक्षा दालन, ग्रीन रुम, वाहनतळ अशा सर्व सोयी सुविधा देण्यात येणार आहेत.