दिवाळीत मिठाई, चॉकलेटपेक्षा काजू, बदामला अधिक पसंती

विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : सुकामेव्याचा घाऊक बाजार पुन्हा वधारला असून आरोग्याला घातक ठरण्याची भीती असलेल्या मिठाई, चॉकलेटपेक्षा घरगुती फराळात सुकामेव्याने यंदा चांगलेच स्थान मिळणार आहे.

मंदावलेल्या घाऊक बाजाराला उभारी देताना केवळ मुद्दलला प्राधान्य देणाऱ्या व्यापाऱ्यांनी यंदा सुकामेव्याचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे आवाक्यात ठेवले आहेत. त्यामुळे दिवाळीत काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, मणुका यांचे दर गतवर्षांपेक्षा कमी आहेत.

दरवर्षी मिठाईच्या दुकानाबाहेर सुकामेव्याची होणारी मोठय़ा प्रमाणातील विक्री यंदा मंदावली आहे. अनेक कॉपोरेट कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत सुकामेवा भेट म्हणून देत असतात. त्यामुळे ही घाऊक विक्री सुकामेवा व्यापारी व मिठाईच्या दुकानांना वर्षभराचे चलन देणारी आहे. करोनामुळे अनेक कंपन्यांना कामगार व वेतनकपातीची कुऱ्हाड उगारावी लागली आहे. दिवाळीपूर्वी वेळेवर पगार मिळाला तरी पुरेसे असल्याची अपेक्षा कामगार वर्ग व्यक्त करीत आहे. एलआयसी एजन्ट, कंत्राटदार ग्राहकांना खूश करण्यासाठी दिवाळीत सुकामेवा आपल्या ग्राहकांना देत असल्याचा पायंडा पडला आहे. अनेक ग्राहकांना विविध आजारांनी ग्रासले असल्याने मिठाई खाण्याला बंधने येत असतात. त्यामुळे फळे किंवा सुकामेवा यांना प्राधान्य मिळाले आहे. त्यात ह्य़ा भेटवस्तू खराब होत नाहीत, मात्र यंदा करोना काळात या भेटवस्तूंवर देखील संक्रात आल्याचे सुकामेवा घाऊक बाजाराचे संचालक विजय भुता यांनी सांगितले. भेटवस्तू देण्यावर परिणाम झाला असला तरी यंदा स्वच्छता व आरोग्याचा विचार करता प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या सुकामेवा खाण्यावर सर्वसामान्य ग्राहकांनी देखील भर दिला आहे. मिठाई व चॉकलेटमधील अन्य नाशिवंत दुग्धजन्य पदार्थामुळे आरोग्य बिघडण्याची अनेक ग्राहकांना भीती वाटत असून करोना काळात प्रकृती बिघडणे परवडणारे नाही. त्यामुळे सुकामेवा खाण्याला ग्राहकांनी प्राधान्य दिल्याने दसऱ्यानंतर सुकामेव्याला चांगला उठाव आला असल्याचे एपीएमसी बाजारातील घाऊक व्यापारी महावीर राठोड यांनी सांगितले. नफ्याची जास्त चिंता न स्वस्त माल देण्याचा प्रयत्न आहे. नफा कमविण्यासाठी पुढचे वर्षे आहे असेही राठोड यांनी सांगितले.

सुकामेवा दर

* काजू  ५५०

* बदाम ६९० —८००

* पिस्ता १००० — १२००