फोडलेल्या बाटल्यांच्या काचांमुळे नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता

उरणमध्ये सिडको तसेच इतर आस्थापनांच्या माध्यमातून रस्ते आणि उड्डाणपुलांचे जाळे उभारले जात असून कामे सुरू असलेल्या ठिकाणी मद्यपींचे अड्डे बनले आहेत. या ठिकाणी मद्यपी बाटल्या रित्या करून त्या तिथेच टाकून देतात. त्यामुळे पहाटे व्यायामासाठी येणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकारचे मद्यपींचे अड्डे उरण परिसरात वाढू लागले आहेत.

उरणच्या अनेक भागांत रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे. यातील अनेक रस्ते बांधून तयार आहेत, मात्र तिथे वाहतूक सुरू झालेली नाही. सध्या शाळेला सुटी असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना सायकल शिकविण्यासाठी आणि सकाळी व सायंकाळी चालण्यासाठी या रस्त्यांचा वापर करतात.

यात महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आदींचाही समावेश असतो. याच रस्त्यांचा वापर रात्रीच्या वेळी मद्यपींकडून केला जातो.

मद्यांच्या बाटल्या, त्यांचे खोके, त्यासोबत खालेल्या पदार्थाची वेष्टने आणि अर्धवट उरलेले पदार्थ रस्त्यांवर टाकलेले असतात, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक मधुकर ठाकूर यांनी दिली.

मद्याच्या बाटल्या रस्त्यातच फोडून टाकल्या जात असल्याने आम्हाला पहाटे चालण्यासाठी आल्यावर त्याचा त्रास सहन करावा लागतो, असे सुमती पाटील या महिलेने सांगितले. अनवधानाने बाटल्यांच्या काचांवर पाय पडला, तर  दुखापत होऊ शकते. त्यामुळे या मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवासी करत आहेत.

या संदर्भात उरण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. कारवाईची मागणी करण्यात येत आहे.