७०० मीटर जागेच्या तिढय़ामुळे मोरबेच्या जलवाहिनीच्या कामाची रखडपट्टी

नवी मुंबई</strong> : मोरबे धरणातील पाणी दिघ्यापर्यंत पोचविण्याच्या कामाला वेग आला असला तरी दिघ्यातील जागेचा अडथळा निर्माण झाला आहे. येथील ७०० मीटर पाण्याची जलवाहिनी टाकण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐरोली, दिघा आणि रबाळेसह एमआयडीसी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईतून तातडीने मुक्तता मिळण्याची आशा दुरावली आहे. सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. परंतु आता दिघा येथील गवतेवाडी येथील जागेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मोरबेचे पाणी दिघ्यापर्यंत पोहचण्यास विलंब लागणार असल्याचे चित्र आहे.

खालापूरनजीक धावरी नदीवर  मोरबे धरण उभारण्यात आले आहे. या धरणामुळे नवी मुंबई जलसंपन्न आहे. प्रतिदिन ४५० दशलक्ष लिटर क्षमतेचा नवी मुंबई पालिकेच्या मालकीचा  हा जलस्रोत आहे. भोकरपाडा येथे ४५० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे.

नवी मुंबईकरांना या धरणातून मुबलक पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबईत मोरबे धरणातून दिवसाला अंदाजे ४३० एमएलडी पाणी उचलले जाते. तर याच धरणातून उचललेल्या पाण्यावर भोकरपाडा येथे प्रक्रिया केली जाते. धरणातील पाच एमएलडी पाणी नजीकच्या गावांना दिले जाते.

त्यानंतर सिडकोने वसवलेल्या कामोठे नोडसाठी ३५ एमएलडी पाणी दिले जाते. त्यानंतर खारघर नोडसाठी पाच एमएलडी पाणी दिले जाते. उर्वरित पाणी नवी मुंबई शहराला पुरवले जाते. मात्र आजवर नवी मुंबईतील ऐरोली, दिघा आणि रबाळे परिसरात मोरबे धरणातील पाणी पोचलेले नाही. त्याऐवजी येथील नागरिकांना एमआयडीसीकडून पाणी पुरवले जाते. त्यासाठी पालिका ५५ एमएलडी पाणी एमआयडीसीकडून घेते.

नवी मुंबई पालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातील पाणी दिघ्यापर्यंत पोचवायचे आहे. त्यासाठी काम करण्यात आले असून दिघा येथे ७०० मीटरची जलवाहिनी टाकण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 -सुरेंद्र पाटील, शहर अभियंता