नवी मुंबईचाच भाग असलेल्या उरणमधील द्रोणागिरी नोडचा विकास सुरू झाला असून विकासाची गती कमी असतानाही या नोडमधील साडेबारा टक्केच्या एका भूखंडाला ७० लाखांचा दर मिळू लागला आहे. त्यामुळे येत्या काळात उलवा नोडप्रमाणे द्रोणागिरी नोडमधील भूखंडाचीही एक कोटीच्या दराकडे वाटचाल सुरू असल्याचे बोलले जात आहे. सध्या द्रोणागिरीमधील भूखंडाची संख्या घटू लागल्याने भूखंडाच्या दरात वाढ झाली असल्याचे मत या व्यवसायातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.जमिनीच्या किमती झपाटय़ाने वाढू लागल्या असून महत्त्वाच्या ठिकाणांच्या भूखंडाची किमतींचे दरही वाढू लागले आहेत. द्रोणागिरी नोडमधील रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या सेक्टरमधील भूखंडाचे २० ते २२ लाख रुपये असलेले दर सध्या दुपटीने वाढले आहेत. नवी मुंबईच्या उलवा नोडचा विकास पूर्ण होत आल्याने आता रियल इस्टेटमधील व्यावसायिकांची नजर उरणच्या द्रोणागिरी नोडवर पडली आहे. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणच्या भूखंडाची खरेदी जोमाने सुरू आहे. सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सिडकोकडून मिळणाऱ्या साडेबारा टक्के भूखंडांची लॉटरी निघाल्यानंतर अनेकांना मोक्याच्या जागी भूखंड मिळाले आहेत. उरणमधील द्रोणागिरी नोड हा नवी मुंबईतील सर्वात मोठा नोड आहे. मात्र एका कोपऱ्यात असल्याने व दळणवळणाच्या साधनांची कमतरता असल्याने येथील भूखंडाला अवघे दहा ते पंधरा लाखापेक्षाही कमी दर मिळत होते. मात्र नव्याने उरण सीवूड रेल्वे मार्ग, अलिबाग उरण रो रो सव्‍‌र्हिस, शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू, विरार ते अलिबाग कोस्टल रस्ता आदी कामे सुरू होणार असल्याने येथील भूखंडांचे दर वाढू लागले आहेत. त्याचप्रमाणे सध्या द्रोणागिरी नोडमधील साडेबारा टक्केच्या भूखंडाची संख्या कमी होऊ लागल्याने कमी झालेल्या भूखंडामुळे दुपटीने भूखंडाचे दर वाढले असल्याचे मत नाव न छापण्याच्या अटीवर भूखंडाची खरेदी विक्री करणाऱ्याने दिली आहे. अशीच स्थिती राहिल्यास भविष्यात उरणमधील द्रोणागिरी नोडमधील भूखंडांनाही कोटींचा दर येण्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.