X

गणेशभक्तांची वाट बिकटच!

संततधार पावसामुळे शीव-पनवेल मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत.

शीव-पनवेल महामार्गावरील खड्डे अयोग्यरितीने बुजवल्याने वाहनांचा वेग कमी

शीव-पनवेल मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले असले, हे काम योग्यरीतीने न झाल्यामुळे वाहने अतिशय कमी वेगाने धावत आहेत. परिणामी कोंडी कायम आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची वाट बिकटच ठरणार आहे. गणेशोत्सवानंतर सर्व मोठे खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवासाठी मोठय़ा संख्येने कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वात जास्त रहदारीचा रस्ता असलेल्या शीव-पनवेल महामार्गावरील खड्डे खडी, वाळू, पेव्हर ब्लॉकने बुजवले, मात्र हे काम योग्य पद्धतीने झाले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी पृष्ठभाग उंच-सखल झाला आहे. चालकांना वाहने अतिशय कमी वेगाने चालवावी लागत आहेत. त्यामुळे कोंडीची समस्या कायम आहे.

संततधार पावसामुळे शीव-पनवेल मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. हा मार्ग बांधणाऱ्या शीव-पनवेल टोलवेज कंपनीला संपूर्ण टोल न मिळाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. रस्ता दुरुस्तीची जबाबदारी या कंपनीने झटकली आहे. त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला या मार्गाची दुरुस्ती करावी लागत आहे. राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे हे ५ सप्टेंबपर्यंत बुजवले जातील, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी विधानसभेत दिली होती, मात्र शीव-पनवेल रस्त्यावरील चित्र वेगळे आहे.

गणेशोत्सव आठवडय़ावर आला असल्याने कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यात अलीकडे कोकणात खासगी वाहने घेऊन जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेला महिनाभर सार्वजनिक बांधकाम विभाग शीव-पनवेल महामार्गावरील सर्व खड्डे व उड्डाणपुलांवरील सांधे भरण्याचे काम टप्प्याटप्प्याने करीत आहे. पाटील यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी हे खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

तुर्भे, वाशी आणि कोपरा उड्डाणपुलाजवळील खड्डे हे वाहतूककोंडीस कारणीभूत ठरत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे बुजवले खरे, पण रस्ता समतल नसल्याने वाहनचालकांना ठिकठिकाणी ब्रेक दाबण्याशिवाय आणि वाहनाचा वेग कमी ठेवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पूर्वीपेक्षा कोंडीचे प्रमाण कमी असले, तरी कोंडी कायम आहेच. सुरळीत वाहतूक हे या रस्त्यावरील प्रवाशांसाठी स्वप्नच ठरले आहे.

या मार्गावरील काही उड्डाणपुलांवर सध्या दुरुस्ती सुरू आहे. काही पुलांवरील तुळयांच्या सांध्यामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. हे सांधे भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तुर्भे व कोपरा येथे पेव्हर ब्लॉकचे काम करण्यात आले आहे. पूर्वीचा रस्ता आणि पेव्हर ब्लॉक यांची सांधे भरणी योग्य रीतीने न झाल्याने दोन दुरुस्ती कामांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे. गणेशोत्सवातील वाहन गर्दी कमी झाल्यानंतर महामार्गावरील सर्व खड्डे सिमेंट काँक्रीटीकरणाने भरणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. या मार्गावरील खड्डय़ांमुळे या विभागाला मध्यंतरी अनेक राजकीय पक्षांच्या रोषाला जावे लागले होते.

शीव-पनवेल महामार्गावरील जवळपास सर्व खड्डे बुजविण्यात आले आहेत. काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलेले आहे. मात्र पाऊस आणि डांबर यांच्या सख्यामुळे ही दुरुस्ती योग्य रीतीने झाली नाही. त्यामुळे या रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले होते. त्या मार्गाचे गणेशोत्सवानंतर सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.

– किशोर पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग