आधीच दुष्काळ त्यात वादळाचे संकट यामुळे वसईतील मच्छिमरांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. यामुळे यावर्षी दिवाळीच्या सणाला कोळीवाडय़ात शुकशुकाट दिसला. आधीच कर्जाचे डोंगर आणि त्यात नैसर्गिक वादळे यामुळे हातात पैसा नसल्याने यंदाची दिवाळी कोळीवाडय़ात साजरी झाली नाही. उलट दिवाळी उसनवारीत गेली आहे.

पालघर जिल्ह्यातील विविध किनारपट्टीना क्यार चक्रीवादाळाचा तडाखा बसल्याने कोळीबांधव आर्थिक मंदीच्या सावटाखाली सापडला आहे. नारळीपोर्णिमेनंतर जुन-जुलै दोन महिने बंद असलेला मासेमारी हंगाम ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाला. मात्र सतत खराब वातावरणामुळे मच्छीमारांना बोट समुद्रात उतरवता आल्या नाहीत. त्यातच सप्टेंबर महिन्यात आलेल्या गणेशोत्सव व ऑक्टोबर महिन्यातील नवरात्रीने मासेमारीची मागणी मंदावल्याने मासेमारी व्यवसाय ठप्पच होता. या दोन्ही महिन्यात व्यवसायच न झाल्याने दिवाळीतील मासेमारीवर मच्छीमारांचे लक्ष होते. दिवाळीत मासळीची मागणी चांगली असल्याने कोळीबांधव या सणाकडे मोठी आस लावून बसले होते. परंतु यंदा दिवाळीत ‘कयार’ चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्याने मासेमारी पूर्णपणे बंद झाली.  दिवाळीत मागणी असूनही माल नसल्याने मासळीबाजार ठप्प झाले आहेत. हवामान खात्याने चक्रीवादळाच्या अंदाजामुळे समुद्रात मासेमारीला न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या ७५० हून अधिक बोटीसध्या किनाऱ्यावर आहेत. त्याचबरोबर मागील काही दिवसात पडलेल्या पावसाने सुक्या मासळीचेही मोठे नुकसान झाले आहे. लाखो रुपयाची मासळी  कुजून खराब झाली. यामुळे कोणताही मार्ग नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी जीवावर उदार होऊन कोळी बांधव समुद्रात बोट घेऊन जात जात आहेत. मात्र तरीही हवी तितकी मासळी हाती लागत नसल्याने व्यवसायात गुंतवलेला पैसा निघणे कठीण झाले आहे.

दिवाळीपर्यंत केलेली मासेमारी व्यवसायाला ग्रहण लागल्याने कोळीबांधव हवालदिल झाले आहेत. इंधन, मजुरी आणि बर्फासाठी करावा लागणारा खर्चही निघालेला नाही. यासंदर्भात मस्य आयुक्तालय सचिव यांना पत्र देऊन नुकसान भरपाईसाठी मागणी केली असल्याचे अर्नाळा येथील रहिवाशी जनार्दन मेहेर यांनी सांगितले.