नवी मुंबई : रोडपाली येथील रिलायन्स स्मार्ट पॉइंट मॉल येथून दोन अनोळखी इसमांनी जेमिनी खाद्यतेलाचे व इतर साहित्य असा एकूण ७० हजारांचा माल खरेदी करून एन.ई.एफ.टी.द्वारे पेमेंट करण्याचा बहाणा केला. ही घटना ८ एप्रिल रोजी घडली. या इसमांनी व्यवहाराचा खोटा संदेश दाखवून रिलायन्स मॉलची फसवणूक केली. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्यावर गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक केली.

सदर गुन्ह््याच्या तपासादरम्यान कक्ष २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे, पोलीस हवालदार अनिल पाटील, कानू यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, ट्रान्झॅक्शनचा संदेश आलेले अकाऊंट व इतर तांत्रिक बाबींचा तपास करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यासिन मोहंमद गुलाम राहिमान शेख (२८, रा. डायमंड शिळ फाटा, मुंब्रा) आणि दिलीप भैरव गुप्ता (२४, रा. नायर चाळ, खंडोबा मंदिर, महाराष्ट्रनगर, मानखुर्द, मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील यांनी आरोपींच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीबाबत सखोल तपास करण्याबाबत आदेश दिले असून त्यानुसार साहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल यांनी सदर आरोपींकडे सखोल तपास करता आरोपी हे वेगवेगळ्या किराणा दुकानात व मॉलमध्ये जाऊन सामान खरेदी करतात, असे समोर आले. त्याच वेळी ज्या खात्यात शिल्लक रक्कम नसते अशा खात्यात नमूद दुकानातील पेटीएम स्कॅन करतात. स्कॅन केल्यानंतर अगोदर व्यवहार झाल्याबाबतचा संदेश मोबाइलवर येतो. तोच संदेश आरोपी संबंधित दुकान मालकास दाखवतात व घाई असल्याचे दाखवून तिथून पसार होतात. त्यानंतर काही वेळातच ट्रान्झॅक्शन फेलचा मेसेज संबंधितांना येतो. अशा प्रकारे अनेकांची फसवणूक त्यांनी केली आहे.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यातील सगळा माल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना अटक केल्यावर अशाच प्रकारच्या दोन गुन्ह्यांची उकल झाली असून दोन्ही गुन्हे कळंबोली पोलीस ठाणेअंतर्गत घडले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिधर गोरे यांनी दिली.