उरणच्या द्रोणागिरी नोडमधील गोदाम परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस असल्याची बतावणी करीत वाहनचालक, वाहतूकदार व व्यवस्थापक यांच्याकडील रोख रक्कम चोरी करून पसार होणाऱ्या पवन खतेरीलाल अरोरा(४०) राहणार पुणे या तोतया पोलिसाला उरण पोलिसांनी सोमवारी अटक केली. हा तोतयाने या परिसरात दीड वर्षांपासून धुमाकूळ घातला होता. त्यामुळे उरण पोलिसांना तो दहा गुन्ह्य़ात हवा होता. उरण पोलीस त्याची अधिक चौकशी करीत आहेत. तोतया पोलिसाला अटक झाल्याने येथील वाहनचालक व मालकांनीही नि:श्वास सोडला आहे.
उंचपुरा व पोलिसांसारखा दिसणारा असल्याने अरोरा हा द्रोणागिरी नोडमध्ये दररोज रात्री येत असे. या परिसरात मालाची ने-आण करण्यासाठी दररोज हजारो कंटेनर वाहने येतात. त्यांच्या वाहनचालकांकडे माल वाहतुकीसाठी पैसे असतात.
तसेच मोठय़ा वाहतूकदारांचे व्यवस्थापक येथे पैसे घेऊन येऊन प्रत्येक चालकाला त्याच्या गरजेनुसार पैसे देण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे कंटेनर लवकरात लवकर बंदरात जावा याकरिताही पैशांची देवाणघेवाण केली जाते.
याची माहिती असल्याने रात्रीच्या वेळी मोटारसायकलवर येऊन व्यवहार सुरू असलेल्या ठिकाणी आपण पोलीस आहोत. वाहनाची कागदपत्रे दाखवा, व्यवहार काय सुरू आहे. असे सांगून त्यांचे पैसे घेऊन फरार होत होता. अशा वेळी विरोध करणाऱ्यांना धमकावीत असल्याने तक्रारी करण्यापलीकडे काहीच केले जात नव्हते.
अशा प्रकारच्या फसवणुकीच्या दहा तक्रारी उरण पोलिसात दाखल करण्यात आल्या होत्या. याचा तपास उरण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एम.आव्हाड करीत होते.
त्यांना सोमवारी अशीच फसवणूक होत असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या तोतया पोलिसाला अटक केली आहे.
अधिक तपास सुरू असून तो पुणे आणि नवी मुंबई अशा दोन ठिकाणी राहत आहे.