सिडको ठेकेदाराकडून सेक्टर-६ मध्ये कचऱ्याच्या गाडय़ा रित्या

स्वच्छ भारत मोहिमेला हरताळ फासणारा प्रकार सध्या नवीन पनवेलच्या सेक्टर-६ मध्ये घडत आहे. घंटागाडी व कचरापेटय़ांतून गोळा केलेला कचरा हा कचराभूमीऐवजी येथील रस्त्यांवरच रिकामा केला जात आहे. सिडकोच्या ठेकेदाराचा हा प्रताप असल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांनी केला असून त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नवीन पनवेल सिडकोने विकसित केले आहे. हा भाग आता पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट झाला असला तरीही घनकचरा व्यवस्थापन हे सिडकोच्या माध्यमातूनच केले जात आहे. सिडकोने कचरा व्यवस्थापनासाठी नेमून दिलेल्या ठेकेदाराचे कामगार घराघरांतून व कचरापेटय़ांतून गोळा केलेला कचरा हा थेट नवीन पनवेलमधील सेक्टर-६ च्या रस्त्यावर रिता करतात. त्यांना विचारणा केली असता रविराज ठेकेदाराचे नाव सांगतात, असे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.

या संदर्भात सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर यांना विचारले असता, या प्रकरणी चौकशी करून नंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. अशाच प्रकारे आदईतही कचरा रस्त्यावर टाकत असल्याने सिडकोमार्फत ठेकेदाराला नोटीस बजावल्या होत्या, त्यानंतर आदई येथे कचरा टाकणे ठेकेदाराने बंद केले होते.