12 November 2019

News Flash

विमानतळ प्रकल्पातील डुंगी गाव पुन्हा पाण्यात

डुंगी गाव भरावाच्या खाली गेल्याने गेली दोन वर्षे या गावाच्या चारही बाजूने पाणी साचत आहे

शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष; सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून केवळ पाणी साचल्याचे सर्वेक्षण

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात विस्थापित न होणारे पण गेल्या वर्षी पाण्याखाली गेल्याने स्थलांतरीत करण्यात येणारे पारगाव डुंगी ग्रामस्थ पहिल्याच पावसात पुन्हा पाणी साचल्याने त्रस्त झाले आहेत.

विमानतळ पॅकेज खाली हे गाव स्थलांतरीत केले जाणार नसून आपत्ती व्यवस्थापनाखाली स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रायगड प्रांत, तहसिलदार या गावाची दखल घेण्याची आवश्यकता असताना ग्रामस्थांच्या हे अधिकारी या गावाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. सिडकोच्या अधिकाऱ्यानी पाणी साचल्याचे सर्वेक्षण करून पाठ फिरवली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यात नाराजी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या गावात आता १४१ कुटुंब शिल्लक आहेत.

उलवा टेकडीची उंची कमी करताना त्याच्या उत्खन्नातून निघणारी माती विमानतळाच्या धावपट्टीसाठी भराव म्हणून वापरण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर बाजूस असलेले पारगाव डुंगी गाव भरावाच्या खाली गेल्याने गेली दोन वर्षे या गावाच्या चारही बाजूने पाणी साचत आहे. गेल्या वर्षी पाणी साचल्याने पुण्यातील एका केंद्रीय संस्थेच्या वतीने या गावाचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. त्यांच्या अहवाला नुसार सिडकोने मे महिन्यात हे गाव स्थलातंरीत करण्याचा निर्णय जाहीर केला पण पाणी साचत असल्याने हे गाव आपत्ती व्यवस्थापन कायद्याने स्थलांतरीत करण्यात येणार असून ग्रामस्थांना विमानतळ पॅकेजे मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. विमानतळ पॅकेज हे सर्वात्तम असून त्यात आपत्ती व्यवस्थापनापेक्षा जास्त मोबदला आहे. त्यामुळे

ग्रामस्थ स्थलांतर करण्यास तयार नाहीत. या प्रकल्पात दहा गावे स्थलांतरीत झालेली आहेत. हे स्थलांतर अंतीम टप्यात आले असल्याने राजकीय पक्ष देखील या डुंगी गावाच्या स्थलांतराकडे गांर्भीयाने पहात नाहीत. रविवार मध्यरात्री पासून सुरु झालेल्या पावसात डुंगी गावात पाच फुट पाणी साचल्याने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा वेळी शासकीय यंत्रणांची मदत अपेक्षित असताना गावात प्रांत तसेच तहसिलदर किंवा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाचा एकही अधिकारी फिरकला नाही तर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी उंटावरुन शेळ्या हाकताना पाणी साचल्याचा सचित्र अहवाल घेऊन धूम ठोकली. त्यामुळे डुंगी गावातील ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत.

गेल्या वर्षी प्रमाणे डुंगी गावात पाणी साचले आहे. सिडकोने केलेल्या भरावामुळे आजूबाजूच्या गावांना होणारा धोका लक्षात आलेला नाही. प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला केलेल्या सहकार्याची किंमत डुंगी ग्रामस्थांना चुकवावी लागत आहे. एकही शासकीय अधिकारी या गावाच्या समस्याकडे लक्ष देत नाही. सिडकोचे अधिकारी लांबूनच सर्वेक्षण करून जात आहेत.

– महेंद्र पाटील, अध्यक्ष, नवी मुंबई प्रकल्पग्रस्त शेतकरी संर्घष समिती.

First Published on July 3, 2019 4:46 am

Web Title: dungi village in airport project again in under water due to heavy rain zws 70